मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमधील उर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वत:च्या हाताने चप्पल घालण्यास मदत केल्याचे समोर आले आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. शिवाय, ज्योतिरादित्य शिंदे यांनी नेमकं असं का केलं हे जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता होती.
प्रद्युम्न सिंह तोमर हे जवळपास दोन महिन्यांपासून अनवाणीच होते. त्यांनी आपल्या मतदार संघातील रस्त्यांची अवस्था ही चांगली होत नाही तोपर्यंत पायात काहीच न घालण्याचा संकल्प केला होता. मात्र आता त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची कामे झाले असल्याने, त्यांनी केलाला संकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वत:च्या हाताने मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना चप्पल घालण्यास मदत केल्याचे समोर आले आहे.
ग्वाल्हेरमधील फूलबाग ते सेवानगर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली होती. शिवाय त्याचे कामही अर्धवट अवस्थेत होते. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या तोमर यांच्याकडे तक्रार केली होती. ज्यानंतर तोमर यांनी जोपर्यंत रस्त्याची अवस्था नीट होत नाही तोपर्यंत चप्पल,बूट न घालण्याचा संकल्प केला होता.
राज्याच्या उर्जामंत्र्यांनी असा संकल्प केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आणि त्यांनी तातडीने हालचाल सुरू केली. यानंतर रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे उर्जामंत्र्यांचा संकल्पही पूर्ण झाला.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गौरव दिवस कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरमध्ये पोहचले होते. यावेळी अन्य एका कार्यक्रमस्थळी असताना त्यांनी तोमर यांचा संकल्प पूर्ण झाल्यामुळे त्यांना स्वत: चप्पल घालण्यास मदत केली. यानंतर तोमर सुद्धा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पाया पडले.