Former ISRO Chief K Kasturirangan Death: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बेंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि तेव्हापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी, त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
तीस वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये काम करणाऱ्या कस्तुरीरंगन यांनी १९९४ ते २००३ दरम्यान संस्थेचे प्रमुख म्हणून काम केले होते. हा काळ भारतीय अंतराळ संस्थेसाठी अत्यंत कठीण काळ होता. या काळात इस्रोवर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले होते. १९९८ मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर हे निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते.
कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालीच इस्रोने स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारला आणि चांद्रयानसारख्या मोठ्या मोहिमांसाठी नियोजन करण्यास सुरुवात केली होती. कस्तुरीरंगन पुढे राज्यसभेचे सदस्य आणि नंतर नियोजन आयोगाचे सदस्य झाले होते. त्यांनी सरकारमध्ये इतर अनेक सल्लागार पदांवरही काम केले आहे. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि अगदी पर्यावरण यासारख्या विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला देणाऱ्या समित्यांचे ते अध्यक्ष होते किंवा त्या समित्यांमध्ये ते सदस्य होते.
कस्तुरीरंगन यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशासाठी दिलेले निस्वार्थी योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रोची सेवा मोठ्या परिश्रमाने केली, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण देखील झाले आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केले.”
“डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे, ते एक दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमामागील मार्गदर्शक होते. इस्रो आणि भारतीय विज्ञानातील त्यांचे योगदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील,” असे अंतराळ विभागाचे प्रभारी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.