नवी दिल्ली
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळय़ाप्रकरणी ‘भारत राष्ट्र समिती’च्या आमदार व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांची शनिवारी ‘ईडी’ चौकशी करणार आहे. पण, त्यापूर्वी ‘तिसऱ्या आघाडी’च्या शक्तिप्रदर्शनासाठी त्या दिल्लीत येऊन दाखल झाल्या. महिला आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी ‘जंतर-मंतर’वर १८ विरोधी पक्षांच्या महिला नेत्या एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.
मद्यधोरणातून लाचखोरी केल्याच्या आरोपाखाली ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया ‘सीबीआय’ कोठडीत आहेत. या प्रकरणात मद्य व्यापाऱ्यांच्या ‘दक्षिण गटा’चा सहभाग असल्याचा संशय आहे. के. कविता या ‘दक्षिण गटा’च्या प्रमुख असून व्यापाऱ्यांच्या या गटाने आम आदमी पक्षाला लाच दिली. या पैशाचा वापर ‘आप’ने गोव्यातील विधानसभा निवडणुकीत केल्याचाही ‘ईडी’ला संशय आहे.‘ईडी’ने बजावलेल्या नोटिशीविरोधात कविता आक्रमक झाल्या असून गुरुवारी भाजपवर त्यांनी शाब्दिक हल्लाबोल केला.