एकीकडे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अशरफ घनींच्या नेतृत्वात असलेल्या सरकारला जबाबदार धरलं असताना दुसरीकडे रशियानं देखील अशरफ घनी यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, असं करताना रशियानं अमेरिकेच्याही एक पाऊल पुढे जात तालिबान्यांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, अजूनही रशियामध्ये तालिबान ही सरकारी नोंदीनुसार एक दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे पाकिस्तान, चीन नंतर तालिबानी राजवटीसाठी अनुकूल ठरणारा रशिया हा तिसरा देश ठरू पाहात आहे. या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या जागतिक समीकरणांची आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

रशियाचे अफगाणिस्तानमधील दूत दिमित्री झिरनोव्ह यांनी अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि विशेष म्हणजे काबुलमध्ये तालिबान्यांनी काल घुसून शहर आणि आख्खा देश ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांचं कौतुक केलं आहे. “काबुलमधली परिस्थिती आता अधिक सुरक्षित दिसत आहे. इतकी की जेवढी माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींच्या काळात देखील नव्हती. काबुलमध्ये आता शांततापूर्ण वातावरण आहे”, अशा शब्दांत रशियानं तालिबानचं कौतुक केलं आहे. त्यामुळे एकीकडे अमेरिका तालिबानला कडवा विरोध करत असताना रशियानं मात्र समर्थनाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

आम्हाला आश्चर्य वाटलं…

दरम्यान, रशियानं प्रतिक्रिया देताना आश्चर्य वाटल्याचं म्हटलं आहे. “अमेरिकी फौजा अमेरिकी नागरिकांना अफगाणिस्तानमधून काढण्याचा प्रयत्न करत असताना देखील ज्या वेगाने तालिबाननं संपूर्ण देशावर ताबा मिळवला, ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. इतरही अनेक देशांना याचं आश्चर्य वाटलं असणार”, अशी प्रतिक्रिया रशियाकडून देण्यात आली आहे.

अफगाणिस्तान संघर्ष : जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण; म्हणाले, “अफगाणी नेत्यांनी…”

पत्त्यांप्रमाणे आधीची सत्ता कोसळली!

“काल अगदी पत्त्यांप्रमाणे आधीची सत्ता कोसळून पडली. अफगाणिस्तानमध्ये एक प्रकारची गोंधळाची, सत्तेच्या पोकशीची भावना होती. या परिस्थितीत समाजकंटक रस्त्यांवर फिरत होते. सुरुवातीला नि:शस्त्र तालिबानी गट काबुलमध्ये दाखल झाला. त्यांनी सरकार आणि अमेरिकी फौजांना शस्त्र खाली ठेवायला सांगितलं. राष्ट्राध्यक्ष घनी यांनी पलायन केल्यानंतर शस्त्रधारी तालिबानी काबुलमध्ये आले”, असं झिरनोव्ह यांनी म्हटलं आहे.

 

अमेरिकेचा तीव्र संताप!

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षानंतर मला एक गोष्ट समजली की अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कर परत बोलवण्यासाठी योग्य अशी कोणतीच वेळ नव्हती. यामागील धोक्याची आम्हाला जाणीव होती. मात्र खरं सांगायचं झाल्यास सर्व घटना या आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षाही अल्पावधीत घडल्या. तर तिथे झालं काय यासंदर्भात बोलायचं झाल्यास अफगाणिस्तानमधील राजकीय नेत्यांनी लवकर हार मानली आणि ते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानचं लष्करही कोलमडलं”, असं बायडेन म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabul safer after taliban takes over then ashraf ghani rule says russia ambassador to afghanistan dmitry zhirnov pmw