Kailash Mansarovar Yatra to resume after 5 years : कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही यात्रा उत्तराखंडच्या लिपुलेख आणि सिक्कीमच्या नाथु ला पास येथून जून आणि ऑगस्ट २०२५ दरम्यान सुरू केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. यासाठीचे अर्ज सुरू झाले असून http://kmy.gov.in या वेबसाईटवर यात्रेकरू नोंदणी करू शकतात. यानंतर यात्रेकरूंची निवड ही संगणकीकृत पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या पाच तुकड्या लिपुलेख पामधून आणि प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या १० तुकड्या या नाथू ला पासमधून जातील.
२०१५ सालापासून मानसरोवर यात्रेसाठी अर्ज आणि निवड प्रक्रिया ही पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आली आहे. कोणत्याही शंका विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पत्र पाठवण्याऐवजी अर्ज करणार्यांनी वेबसाइटवरील अभिप्राय पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कैलास मानस सरोवर यात्रा ही भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पुन्हा सुरू केली जात आहे. २०२० मधील गलवान येथे झालेला संघर्ष आणि कोरोना महामारीमुळे ही यात्रा बंद पडली होती. मात्र ऑक्टोबर २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारले आहेत.
यापूर्वी अखेरची यात्रा ही २०१९ मध्ये झाली होती पण २०२० मध्ये कोरोना साथीचा प्रकोप आणि नंतर सीमेवरील तणाव यामुळे ती स्थगित करण्यात आली होती. मात्र भारताने चीनसमोर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.
दरम्यान ही यात्रा पुन्हा एकदा दोन मार्गांनी सुरू केली जाणार आहे. ज्यामध्ये उत्तराखंडमधील लिपुलेख पास आणि सिक्कीममधील नाथु ला पास यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणाजे जेव्हा या यात्रेसाठी भारताने पिथोरागड ते लिपुलेख असा ८० किलोमीटरचा रस्ता बांधला तेव्हा चीनने नेपाळला चिथावणी दिली होती. हा भाग धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि भारत, चीन आणि नेपाळमधील ट्राय-जंक्शनचा भाग आहे.