कैलाश सत्यार्थी यांच्या नोबेल पुरस्कार चोरणाऱ्यांना अटक झाली आहे. सत्यार्थी यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राची चोरी झाली होती. त्याबरोबरच काही दागिने देखील चोरी झाले होते. या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती, दागिने आणि प्रमाणपत्र पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी सत्यार्थी यांच्या घरी चोरी करणाऱ्या चोरांना अटक केली. या टोळीबाबत पोलिसांना शनिवारीच माहिती झाली होती. पोलिसांनी त्यांना अटक करण्याची योजना आखली होती. त्याप्रमाणे आज सकाळीच पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. सत्यार्थी यांच्या ग्रेटर कैलाश येथील घरात चोरी झाली होती. सत्यार्थी हे काही कामानिमित्त अमेरिकेमध्ये होते. त्यावेळी ही चोरी झाली. नोबेल पारितोषिक आणि प्रमाणपत्रांची चोरी झाल्यामुळे सत्यर्थी नाराज झाले होते. ही दुःखद घटना आहे असे ते म्हणाले होते. या घटनेमुळे लहान मुलांच्या भवितव्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला असल्याचे ते म्हणाले.
सत्यार्थी यांच्या घरात इतरही काही मूल्यवान वस्तू होत्या परंतु चोरांचा उद्देश दागिने चोरी करण्याचा होता असे पोलिसांनी म्हटले. नोबेल पारितोषिकाच्या वेगळेपणामुळे ते चोरांनी नेले असावे असे पोलिसांनी म्हटले.
कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना २०१४ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. भारतात लहान मुलांना मुक्तपणे जगू दिले जात नाही. जगण्याच्या लढाईत नकळत्या वयात त्यांना जुंपले जाते आणि शाळेच्या दप्तराऐवजी घर चालविण्याचे ओझे त्यांच्या चिमुकल्या खांद्यावर देऊन त्यांना कामाला जुंपले जाते. या विरोधात कैलाश सत्यर्थी गेली सुमारे तीन दशके प्रखर लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘बचपन बचाओ आंदोलन’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. गांधीजींचा वारसा जपत त्यांनी विविध लोकशाही आयुधे वापरत आपली चळवळ पुढे नेली आहे. नोबेल पुरस्कार समितीने या बाबीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
२०१५ मध्ये सत्यार्थी यांनी नोबेल पारितोषिकाचे सन्मानचिन्ह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केले होते. हा सन्मान भारताचा आणि लहान मुलांचा आहे असे म्हणत त्यांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडे सोपवला होता. सत्यार्थी यांच्या घरी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि प्रमाणपत्र होते.