अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले कमल हसन लवकरच निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. कमल हसन यांनी वाढदिवसाच्या दिवशी महत्वाची घोषणा केली आहे. कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाने तामिळनाडूतील विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत.
२० विधानसभा मतदारसंघात ८० टक्के कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूका कधी होणार याबद्दल कोणालाही खात्री नाही पण जेव्हा कधी निवडणुका होतील त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे कमल हसन यांनी सांगितले. आज ६४ व्या जन्मदिनी ते पत्रकारांशी बोलत होते. मी लोकांच अस्त्र आहे. मी कुठलाही राजकीय पक्ष किंवा गटासाठी काम करत नाहीय असे कमल हसन यांनी सांगितले.
श्रीलंकेच्या मुद्दावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. आपल्या देशात इतके मुद्दे असताना दुसऱ्या देशातील विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही असे कमल हसन यांनी सांगितले. द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टालिन आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी कमल हसन यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अण्णाद्रमुकच्या १८ आमदारांना अपात्र ठरवण्याचा तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे पोटनिवडणूक आवश्यक बनली आहे.