पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झालेला पराभव मान्य आहे. आता समर्थकांनीही हा निकाल स्वीकारावा, असे भावनिक आवाहन डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केले. तसेच ट्रम्प यांच्याकडे शांततेने सत्तेचे हस्तांतरण करण्याचे वचनही त्यांनी दिले.

निवडणूक निकालानंतर हॅरिस यांनी प्रथमच हॉवर्ड विद्यापीठाच्या आवारात समर्थकांना संबोधित केले. पराभवानंतर भावूक झालेल्या हॅरिस यांनी अमेरिकेतील नागरिकांना दिलेले वचन आणि लढा कायम राहणार असल्याचे सूतोवाच या वेळी दिले. माझे हृदय भरून आले आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञ आहे, असे सांगत हॅरिस यांनी समर्थकांचे मनोबल वाढवण्याच्या प्रयत्न केला.

हेही वाचा >>>CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

‘या निवडणुकीचा निकाल म्हणजे आम्ही कशासाठी लढलो, आम्ही कोणासाठी मतदान केले, किंवा आम्हाला काय अपेक्षित होते, ते नव्हतेच. मला माहीत आहे की नागरिक अत्यंत भावूक आहेत. पण आपण या निवडणुकीचे निकाल स्वीकारले पाहिजे. लोकशाहीचे मूलभूत तत्त्व म्हणजे निवडणुकीचे निकाल स्वीकारणे आहे, ’ असे त्यांनी नमूद केले. तसेच अमेरिका यापुढेही जगात कायम तेजस्वी राहील, असेही त्या म्हणाल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधत विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचेही हॅरिस यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा >>>Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”

संबंध दृढ होणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताकाळात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. परंतु आयात, शुल्क आणि आस्थलांतरण यासारख्या मुद्द्यांवर काही मतभेद होऊ शकतात, असे धोरणात्मक व्यवहार तज्ज्ञांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने दोन्ही बाजूंमधील कठीण प्रश्न सौहार्दपूर्णपणे सोडवले जाण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. ‘कॅपिटल हिल’चे जाणकार अनंग मित्तल म्हणाले, की रिपब्लिकन पक्षातील प्रमुख व्यक्ती आणि पुराणमतवादी विचारवंत २१ व्या शतकाला आकार देण्याच्या दृष्टीकोनातून भारत-अमेरिका संबंध महत्त्वपूर्ण मानतात. ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’चे कार्यकारी संचालक ध्रुव जयशंकर म्हणाले की, भारताला ट्रम्प प्रशासनाबरोबर व्यापार आणि अस्थलांतरणावर काही कठीण वाटाघाटींची आवश्यकता भासू शकते.