Kamala Harris’s Doug Emhoff husband Affair: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांनी एक मोठा दावा केला आहे. आपल्या पहिल्या पत्नीशी नातेसंबंधात असताना दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून पत्नीला दगा दिला होता, असे त्यांनी मान्य केले आहे. एका ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मान्य केले आहे. त्यानंतर सीएनएनशी बोलताना ते म्हणाले, माझी पहिली पत्नी कर्स्टिन आणि मी कठीण प्रसंगातून गेलो होतो. माझ्या काही चुकांमुळे आमच्यात तणाव निर्माण झाला होता. पण मी माझी जबाबदारी ओळखून त्याव काम केले आणि आम्ही त्यातून बाहेर पडलो.”

डग एमहॉफ यांचे हे विधान डेलीमेलच्या एका बातमीनंतर आले आहे. या बातमीमध्ये दावा केला होता की, एमहॉफ यांचे पहिले लग्न विवाहबाह्य संबंधामुळे तुटले होते. कर्स्टिन यांच्याबरोबर नात्यात असताना एमहॉफ यांचे त्यांच्या कुटुंबातील नॅनीशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच या नात्यामधून नॅनी गर्भवतीही राहिल्या होत्या, मात्र त्यांनी पुढे त्या बाळाचा जन्म होऊ दिला नाही. डेलीमेलने याबाबत नॅनीशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी आता या प्रसंगातून बाहेर आल्यामुळे काहीही बोलण्यास नकार दिला.

हे वाचा >> कमला हॅरिस की ट्रम्प, कोण विजयी होणार? बायडेनविषयीचे भाकीत वर्तवणार्‍या ज्योतिषीने केली भविष्यवाणी, कोण आहेत ज्योतिषी एमी ट्रिप?

कोण आहेत डग एमहॉफ?

डग एमहॉफ आणि पत्नी कर्स्टिन हे अमेरिकन चित्रपट निर्माते म्हणून प्रख्यात आहेत. लग्नाच्या १६ वर्षांनंतर २००८ साली त्यांनी घटस्फोट घेतला. या लग्नातून त्यांना दोन मुलं आहेत. घटस्फोट घेतल्यानंतरही पत्नी कर्स्टिनने एमहॉफ हे आडनाव लावण्याचा कायदेशीर आणि व्यावसायिक अधिकार मिळविला आहे. त्यानंतर डग एमहॉफ यांनी २०१४ साली कमला हॅरिस यांच्याशी विवाह केला होता.

हे ही वाचा >> विश्लेषण : कमला हॅरिस जो बायडेन यांची जागा घेऊ शकतील का? डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या नावाला का मिळतेय वाढती पसंती?

मागच्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार जेडी व्हान्स यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर हॅरीस यांच्या समर्थनार्थ एमहॉफ यांच्या पहिल्या पत्नी कर्स्टिन मैदानात उतरल्या होत्या. २०१४ साली लग्न होऊनही कमला हॅरिस यांनी स्वतः मुलांना जन्म दिला नाही, असा आरोप रिपब्लिकन नेत्याने केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना कर्स्टिन म्हणाल्या की, २०१४ पासून हॅरिस यांनी माझ्या दोन मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. आम्ही तिघे मिळून आमच्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहोत.

कमला हॅरिस कोण आहेत?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस चर्चेत आल्या. आशियाई-अमेरिकी आणि आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या. इतक्या उच्च पदावर जाणाऱ्या त्या पहिल्याच मिश्रवर्णी महिला ठरल्या. त्यांची आई श्यामला गोपालन या तमीळ तर वडील डोनाल्ड जे. हॅरिस हे जमैकन-अमेरिकन होते. कायदा या विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीस त्या कॅलिफोर्निया राज्यात प्रशासकीय आणि कायदा क्षेत्रात नोकरी करत होत्या. पुढे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी, ॲटर्नी जनरल आणि सिनेटर असा त्यांचा प्रवास राहिला. २०१६मध्ये अमेरिकेच्या सेनेटमध्ये दाखल झालेल्या त्या दुसऱ्या आफ्रिकी-अमेरिकी महिला आणि पहिल्या आशियाई-अमेरिकी महिला ठरल्या.