US Election 2024 Kamala Harris Use Marathi Language : भारतीय अमेरिकन डेमोक्रेटिक फंडरेझने गुरुवारी कमला हॅरिस यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. दक्षिण आशियाई मतदारांनी कमला हॅरिस यांना मतदान करावं याकरता आशिया खंडातील विविध भाषांमध्ये कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मतदारांना आकर्षित करण्याकरता बॉलिवूड प्रेरित अनेक व्हिडिओ प्रदर्शित केले जात आहेत. कमला हॅरिस यांच्याकडे चांगला दृष्टीकोन आहे, तर ट्रम्प यांना फूट पाडायची आहे. हजारो दक्षिण आशियाई स्वयंसेवक संघटित होत आहेत. दरवाजे ठोठावत आहेत. तसंच, ही शर्यत जिंकण्यासाठी मदत करत आहेत, असं कमला हॅरिस यांच्या मोहिमेसाठी राष्ट्रीय वित्त समितीचे सदस्य अजय भुटोरिया म्हणाले.

हेही वाचा >> अमेरिकेत सहा राज्ये ठरणार अध्यक्षीय निवडणुकीत निर्णायक… कोणती आहेत ही ‘स्विंग स्टेट्स’?

कमला हॅरिस आणच्या समुदायासाठी आनंद आणि आशा व्यक्त करतात. ५० लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन यांच्यासाठी त्या आशेच्या किरण आहेत. आम्ही आमच्या समुदायाला जोडण्यासाठी बॉलिवूडच्या गाण्यांचा वापर करत आहोत, असंही भुटोरिया म्हणाले.

अजय आणि विनिता भुटोरिया यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ रितेश पारीख यांनी तयार केलाय. या व्हिडिओमध्ये मराठी, तेलगू, गुजराती, पंजाबी, हिंदी, बंगाली, तमिळ, मल्याळम, उर्दू आदी दक्षिण आशियाई भाषांचा वापर केला आहे. “हमारी हॅरिस, ये कमला हॅरिस, जितेगी तो नाचो नाचो नाचो”, असे गाण्याचे बोल आहेत. तर, आम्ही कमला हॅरिस यांना मतदान करणार आहोत, तुम्हीही करणार ना? असं विविध भाषांमध्ये विचारलं आहे.

सहा राज्ये निर्णायक…

अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाची पारंपरिक समर्थक राज्ये आहेत. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क ही राज्ये नेहमी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. तर टेक्सास सदैव रिपब्लिकनांच्या पाठीशी उभे राहते. या गणितानुसार डमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलोक्टोरल आणि ट्रम्प यांना २१९ इलेक्टोरल मते मिळतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हॅरिस यांना ४४ आणि ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे. यासाठी पेनसिल्वेनिया (१९), व्हिस्कॉन्सिन (१०), मिशिगन (१५), जॉर्जिया (१६), नॉर्थ कॅरोलिना (१६), अॅरिझोना (११) आणि नेवाडा (६) ही ९३ मते निर्णायक ठरणार आहेत. ही राज्ये स्विंग स्टेट किंवा बॅटलग्राउंड स्टेट म्हणून ओळखली जातात. कारण ती कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकतात. या बहुतेक राज्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बदलता आणि संमिश्र कौल देऊन स्विंग स्टेट म्हणून ओळख निर्माण केली आहे. गेल्या खेपेस बायडेन यांनी पेनसिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन, मिशिगन, जॉर्जिया, अॅरिझोना ही राज्य खेचून आणली आणि निवडणूक जिंकली.