Kameshwar Chaupal Death : अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त आणि बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य कामेश्वर चौपाल (६८) यांचं आज (०७ फेब्रुवारी) निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामेश्वर चौपाल हे रामजन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक होते. त्यांनीच अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची पहिली वीट रचली होती. तसेच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम कार सेवक हा दर्जा दिला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे शोककळा पसरली आहे.
कामेश्वर चौपाल हे राजकारणात येण्यापूर्वी विहिंपचे सहसचिव होते. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात कामेश्वर चौपालचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्या दिवशी देशभरातून हजारो संत आणि लाखो कारसेवक तेथे जमले होते. या ऐतिहासिक प्रसंगी राम मंदिराच्या उभारणीसाठी पहिली वीट रचण्याचा बहुमान कामेश्वर चौपाल यांना मिळाला होता. त्यावेळी देखील ते विहिंपचे सहसचिव होते. यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
कामेश्वर चौपाल हे २००२ मध्ये बिहार विधान परिषदेचे सदस्य झाले आणि त्यानंतर २०१४ पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेश सरचिटणीसपदीही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर भाजपाने कामेश्वर चौपाल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. १९९१ मध्ये त्यांनी रामविलास पासवान यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
१९९५ मध्ये त्यांनी बेगुसरायच्या बखरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली, पण तेथेही त्यांना यश आलं नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना सुपौलमधून उमेदवारी दिली होती. पण त्याठिकाणीही त्यांना यश मिळालं नाही, तेव्हा अडीच लाख मते त्यांना मिळाले होते. दरम्यान, फेब्रुवारी २०२० मध्ये जेव्हा राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली, तेव्हा कामेश्वर चौपाल यांचाही त्यात समावेश होता.