शबरीमला मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचणाऱ्या कनक दुर्गा या ४२ वर्षीय महिलेला कुटुंबियांच्या बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. कनक दुर्गाला तिच्या नवऱ्याने आणि भावाने घरात घेण्यास नकार दिला आहे. नवऱ्याच्या मालापपूरम येथील घरी येऊ नकोस असे कनक दुर्गाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कनक दुर्गाला सरकारी निवारा केंद्रात हलवण्यात आले असून तिथे तिला पोलीस संरक्षणात ठेवले आहे.
भगवान अय्याप्पांचे भक्त आणि हिंदू समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत तिला घरात घेणार नाही असे कनक दुर्गाच्या भावाने सांगितले. दोन जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला.
मागच्या आठवडयात कनकदुर्गा पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली. त्यावेळी सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला. सासूने कनकदुर्गाच्या डोक्यावर प्रहार केला. कनकदुर्गा या हल्ल्यामध्ये जखमी झाली. तिला पेरींतलमन्ना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने मागच्यावर्षी १० ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावर असलेली बंदी हटवली. पण त्यानंतरही मंदिर परिसरात मोठया प्रमाणावर सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करता येत नव्हता. अनेक महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. अखेर नववर्षाच्या दुसऱ्यादिवशी कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनानंतर अपेक्षेप्रमाणे केरळमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला.