सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अनुभवी फलंदाज केन विल्यमसन यांनी रमजानच्या या पवित्र महिन्यात रोजा पाळला आहे. संघाचा फिरकीपटू राशिद खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने ही माहिती दिली. वॉर्नर आणि विल्यमसन या दोघांनी राशिद खान, मुजीब उर रहमानसोबत रोजा पाळला.
राशिदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वॉर्नर म्हणाला, “रोजा खूप चांगला होता, पण हे खूप अवघड आहे. मला खूप भूक लागली आहे.” तर, विल्यमसन म्हणाला, “उपवास करणे चांगले होते, मी चांगले काम करत आहे.”
हैदराबाद संघात असे अनेक मुस्लिम खेळाडू आहेत, जे या पवित्र महिन्यात रोजा पाळतात. खलील अहमद आणि राशिद सोबत मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान या खेळाडूंनी रोजा पाळला आहे. आयपीएलच्या या हंगामात हैदराबादने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मागील सामन्यात मुंबईने हैदराबादला 13 धावांनी पराभूत केले.
आतापर्यंत केन विल्यमसनला हैदराबादच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नाही. चाहत्यांनी विल्यमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यास सुरवात केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा पुढील सामना आता 21 एप्रिल रोजी पंजाब किंग्जबरोबर होणार आहे.