Kangana Ranaut First Parliament Speech: चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत ही नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. कंगना रणौतच्या संसद प्रवेशाचीही जोरदार चर्चा झाली होती. कंगनानं यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घेतलेली खासदारकीची शपथदेखील चर्चेत राहिली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू होऊन जवळपास महिना लोटल्यानंतर कंगना रणौतला गुरुवारी पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्यात आली.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. यादरम्यान, कंगना रणौतनं लोकसभेत आपलं पहिलं-वहिलं भाषण केलं. अगदी काही मिनिटांच्या या भाषणात कंगना रणौतनं तिच्या मंडी मंतदारसंघातले दोन मुद्दे सभागृहासमोर मांडले. तसेच, या मुद्द्यांबाबत केंद्र सरकारकडून नेमकी काय पावलं उचलली जात आहेत? असा प्रश्न कंगना रणौतनं केला. (Kanhana Ranaut in Loksabha)
काय म्हणाली कंगना रणौत?
कंगनानं तिच्या भाषणाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. “अध्यक्ष महोदय, तुमचे मंडीच्या जनतेच्या वतीने आभार मानते की तुम्ही आज पहिल्यांदा मला या सभागृहात मंडी लोकसभा मतदारसंघाबाबत बोलण्याची संधी दिली”, असं कंगना रणौत म्हणाली. विशेष म्हणजे कंगना बोलत असताना सभागृहात कुणीच व्यत्यय आणला नाही वा गोंधळ घातला नाही.
यानंतर कंगनानं हिमाचल प्रदेशमधील घर बनवण्याची कला किंवा लोकरीपासून कपडे विणण्याची कला लुप्त होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. “मंडीमध्ये अशा अनेक कला आहेत ज्या विलुप्त होत चालल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काथ-कुनी नावाची एक घर बनवण्याची पद्धत वा कला आहे. तिथे मेंढ्या व याकच्या लोकरीपासून जॅकेट, टोप्या, शॉल, स्वेटर अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात. विदेशात या वस्तूंना खूप मोठी किंमत मिळते. पण आपल्या देशात या कला पूर्णपणे लुप्त होत चालल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत?”, असा प्रश्न कंगनानं उपस्थित केला.
याच प्रश्नाला जोडून कंगना रणौतनं हिमाचल प्रदेशमध्ये आढळून येणाऱ्या स्थानिक लोकसंगीताच्या संवर्धनाचा मुद्दाही उपस्थित केला. “हिमाचल प्रदेशचं वेगळं असं संगीत आहे. स्पिती, किनौर किंवा भरमौरच्या क्षेत्रात हे स्थानिक लोकसंगीत आढळतं. तिथल्या आदिवासी जमातींमधील कपड्यांच्या प्रकारांप्रमाणेच हे संगीतही विशेष आहे. याचं संवर्धन करण्यासाठी सरकारकडून काय केलं जात आहे?” असा प्रश्न कंगना रणौतनं संसदेतील तिच्या पहिल्या-वहिल्या भाषणात सरकारला विचारला.
कंगना रणौतच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली आहे. मात्र, कंगना रणौतच्या या निवडणुकीला विरोधी पक्षातील उमेदवारानं आक्षेप घेतला आहे. मंडीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे लायक राम नेगी यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरही आपला अर्ज बाद ठरवण्यात आला, असा दावा नेगी यांनी केला आहे. त्यामुळे कंगना रणौत हिची खासदार म्हणून झालेली निवड रद्द केली जावी, अशी मागणी नेगी यांनी याचिकेत केली आहे. (High Court Notice to Kangana Ranaut)
या याचिकेसंदर्भात हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना रणौतला नोटीस बजावत येत्या २१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं आहे.