आधी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर लॉकडाउनच्या काळात सत्ताधारी शिवसेनेसोबत उघड वाद करणारी अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनौतने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लागलीच कंगनानं पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनानं थेट लखनौ गाठलं आणि तिथे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत तिची भेट झाली.

कंगनानं शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं.

काय आहे ODOP मोहीम?

ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

योगी आदित्यनाथ यांचं कंगनाला विशेष गिफ्ट!

या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला दिलं आहे.

कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचं देखील कंगना म्हणाली आहे.

Story img Loader