पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेनला केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज तिसरं महायुद्ध रोखणं शक्य झालं आहे, असं विधान बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने केलं आहे. मंडी येथील एका प्रचार सभेत बोलताना तिने हे विधान केलं. तिच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपाची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.
नेमकं काय म्हणाली कंगना रणौत?
मंडी येथील प्रचारसभेत बोलताना कंगनाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे. “रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ते युक्रेनच्या नागरिकांपर्यंत सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्याकडे आशेने बघत असून पंतप्रधान मोदीदेखील त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांनी रशिया आणि युक्रेनला केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज तिसरं महायुद्ध रोखण्यात यश आलं आहे. जगभरात शांतता राहावी, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत. आज भारताची जी प्रतिमा आहे, ती केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळे आहे”, असं ती म्हणाली.
अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना
रविवारी एका प्रचारसभेत बोलताना कंगना रणौतने स्वतःची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली होती. “संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला आहे की मी राजस्थानला जावो, पश्चिम बंगालला जावो, दिल्लीला जावो किंवा मणिपूरला, लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात, इतका आदर करतात. मी दाव्याने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत इतकं प्रेम व आदर जर कुणाला मिळत असेल तर ती फक्त मी आहे,” असं कंगना रणौत प्रचाराच्या भाषणात म्हणाली.
शेवटच्या टप्प्यात हिमाचल प्रदेशमध्ये मतदान
दरम्यान, कंगना रणौत १४ मे रोजी मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कंगनाची लढत थेट काँग्रेसचे जेष्ठ नेते विक्रमादित्य सिंह यांच्याशी आहे. विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले विरभद्र सिंह यांचे पूत्र आहेत. हिमाचलप्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी मतदान होणार आहे.