Kangana Ranaut अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. चंद्रावरही डाग आहेत पण मोदींवर नाहीत असं कंगनाने म्हटलं आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघाची खासदार आहे. मंगळवारी कंगनाने रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी निष्कंलक आहेत असं म्हटलं आहे.
कंगनाने काय म्हटलं आहे?
“लोकसभा निवडणूक सुरु होती तेव्हा सदैव काळ्या कामांनी बरबटलेल्या काँग्रेसने मंडीच्या मुलीला बदनाम केलं. यांची इतकी बदनामी करा की कुणी निवडणूक लढूच शकायला नको. मात्र मी निवडून आले आणि भाषणाला उभी आहे. यावरुन हे सिद्ध होतं की मुली, महिलांना अपशब्द बोलून, त्यांच्या महत्त्वाकांक्षांची खिल्ली उडवून किंवा त्यांना लाज वाटेल असं बोलणं हे दिवस गेले आहेत. आज मंडी हा मतदारसंघ विकासासाठी ओळखला जातो आहे. मी मंडीच्या जनतेला नमस्कार करते.” असं कंगना म्हणाली.
चंद्रावरही डाग आहेत पण मोदी निष्कलंक-कंगना
“आपण सगळे एकत्र आलो आहोत कारण कारण आपली सगळ्यांची विचारधारा एक आहे. संघ किंवा भाजपाची विचारधाराही सनातन धर्म, वसुधैव कुटुंबकम हेच सांगणारी आहे. जी अनेक युगांपासून चालत आली आहे. काँग्रेसबाबत तुम्ही विचार केला आहे का? तुम्हाला वाटत असेल की यांची विचारधारा काय? तर यांची कुठलीही विचारधारा वगैरे काहीही नाही. यांचा एक मूलमंत्र आहे. चोर चोर मौसेरे भाई. हा काँग्रेसचा मूलमंत्र आहे. २०१४ च्या आधी हा घोटाळा, तो घोटाळा, अमका स्कॅम, चारा घोटाळा, टू जी घोटाळा असे अनंत घोटाळे होते. राजकारणी म्हणजे चोर अशीच आपली तेव्हा समजूत झाली होती. माझ्यासारख्या लोकांना तर वाटत होतं की देश सोडून जावं असं २०१४ च्या आधी वाटत होतं. पण आज आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघा. नरेंद्र मोदी निष्कलंक आहेत. एकवेळ चंद्रावर डाग सापडतील पण मोदी निष्कलंक आहेत.” असं कंगनाने म्हटलं आहे.
काँग्रेसमध्ये गुन्हेगारच जास्त आहेत-कंगना रणौत
एक काळ होता की काँग्रेस भाजपाचं काही ऐकून घेत नव्हतं. १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाली. आपण नुकताच पक्षाचा वर्धापन दिनही साजरा केला. भाजपाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपण संघर्ष केला. याचं कारण काँग्रेसची घाणेरडी नीती होती. या लोकांमध्ये (काँग्रेस) गुन्हेगारच जास्त आहे. एका मताने या लोकांनी अटलजींचं सरकार पाडलं होतं. देशासाठी काहीतरी करण्याची भावना याकडे कुणाकडे नाही. देशासाठी काहीतरी करायचं असेल तर काळीज लागतं. मागच्या आठवड्यात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं. या देशात कुठलीही संस्था, धर्म, व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही हे अमित शाह यांनी सांगितलं. काँग्रेसने समजून घेतलं नाही. मलाही अस्वस्थ होत होतं की अमित शाह समजावून सांगत आहेत हे समजून का घेत नाहीत? तेव्हा मला कुणीतरी सांगितलेलं वाक्य आठवलं की झोपलेल्या जागं करता येतं झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. मी स्वतः संसदेत पाहिलं असंही कंगनाने म्हटलं आहे.