कन्हैया कुमार याला न्यायालयाच्या दारातच मारहाण; दोन पत्रकारांवरही पुन्हा हल्ला
देशाच्या आर्थिक राजधानीत एकीकडे ‘मेक इन इंडिया’चे ढोल पिटले जात असतानाच राजधानी दिल्लीत ‘इंडिया गेट’सारख्या उच्च सुरक्षेच्या विभागात असलेल्या पतियाळा न्यायालयाच्या आवारात उन्मादी वकिलांच्या गटाने बुधवारी पुन्हा झुंडशाहीचे दर्शन घडवीत देशाच्या प्रतिमेलाच गालबोट लावले. त्यांनी दोन पत्रकारांनाच नव्हे तर सुनावणीसाठी आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यालाही मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या निष्क्रिय पवित्र्यानंतर संतप्त सर्वोच्च न्यायालयाने प्रथम वकिलांचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या प्रकाराची सुनावणी गुरुवारी होईल, असे स्पष्ट केले. कन्हैया कुमार याला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जाग आलेल्या केंद्रीय गृहसचिवांनी दिल्ली पोलिसांना अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
मंगळवारी ज्या वकिलांनी पत्रकार, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तील विद्यार्थी व शिक्षकांना मारहाण केली होती तेच वकील बुधवार सकाळपासूनच पतियाळा न्यायालयाच्या आवारात जमून भारताचा झेंडा हाती नाचवत घोषणाबाजी करू लागले. या वकिलांना अशी निदर्शने न करण्याची समज दिल्ली बार असोसिएशनच्या काही वकिलांनी द्यायला सुरुवात करताच ‘देशभक्त’ वकिलांचा उन्माद अधिकच वाढला. त्याचे छायाचित्रण करू पाहणाऱ्या दोन पत्रकारांनाही त्यांनी मारहाण केली. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचे सतर्कतेचे आदेश धुडकावून केवळ बघ्याची भूमिका घेतली. हा प्रकार कन्हैया कुमार याला आणेपर्यंत सुरू होता. देशद्रोहासारखा गंभीर आरोप असलेल्या कन्हैया कुमार याला कच्च्या कैदेतील गुन्हेगाराप्रमाणे तुरळक पोलिसांच्या बंदोबस्तात आणण्यात आले. त्यालाही या वकिलांनी मारहाण केली. ‘‘आमच्याकडे बंदूक असती तर त्याला गोळीच घातली असती,’’ अशी बालिश प्रतिक्रियाही या वकिलांनी उच्चरवाने व्यक्त केली.
या सर्व घटनेची सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आणि कन्हैया कुमार याला संरक्षण देताना कुचराई का झाली, याचा अहवाल गुरुवापर्यंत देण्याचे आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना दिले. पतियाळा न्यायालयातील लज्जास्पद प्रकाराची सुनावणीही सर्वोच्च न्यायालय गुरुवारी घेणार आहे. पतियाळा न्यायालयाच्या आवारात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची होती आणि ती त्यांनी पार पाडली नाही, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.चेलमेश्वर व न्या. अभय मनोहर सप्रे यांनी ओढले आहेत.

बस्सी यांचे डोळ्यावर हात!
विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला मारहाण झालीच नाही, असे बेधडक विधान दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले. अशा वेळी थोडीफार धक्काबुक्की होणारच, असे धक्कादायक विधानही बस्सी यांनी केले. पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही, असे विचारता, तो आमच्या धोरणात्मक नियोजनाचा भाग होता, असेही ते म्हणाले! आम्ही कारवाई केली असती तर त्याची अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटली असती, असे ते म्हणाले. भाजप आमदार ओ. पी. शर्मा व तीन वकिलांविरुद्ध समन्स बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.

उन्मादी देशभक्ती
* दोन दिवसांपूर्वी पत्रकार व विद्यार्थ्यांना मारहाण करणारे विक्रम चौहान व त्याचे साथीदार पुन्हा न्यायालयाच्या परिसरात आले होते. त्यांनी ‘वंदेमातरम’च्या घोषणा देत प्रवेश केला. पत्रकारांशी दंगामस्ती करून त्यांचे मोबाइलही हिसकावले, त्यांचे व्हिडीओ चित्रण काढून टाकले, तरी पोलीस बघतच राहिले, असा पत्रकारांचा आरोप आहे.
* सीएनएन आयबीएनचे पत्रकार अन्वर यांनी सांगितले की, पोलीस बंदोबस्त असूनही न्यायालय परिसरात संबंधित गटाने घोषणाबाजी केली तसेच पत्रकार व विद्यार्थ्यांना मारहाण केली.

Story img Loader