मारहाणीवरून वैद्यकीय तपासणी करण्याचेही आदेश
कन्हैयाकुमार याला बुधवारी पतियाळा न्यायालयात आणले जात असता पोलीस संरक्षण असूनही त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याने सांगूनही हल्लेखोरांना पकडण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही, ही बाब पतियाळा न्यायालयातील सुनावणीतही अधोरेखित झाली. कन्हैयाचे जाबजबाब आता आवश्यक नाहीत त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी असे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे कन्हैयाला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दुपारी तीन वाजता सुनावणी सुरू झाली असता त्याचे वकील वृंदा ग्रोव्हर व सुशील बजाज यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश देऊनही न्यायालयाच्या आवारात िहसक प्रकार झाले.
न्यायालयाच्या दारातही मारहाण होत असता आणि कन्हैयाने हल्लेखोराला पकडा असे सांगूनही येथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यावर कन्हैयाची पतियाळा न्यायालयाच्या कक्षात वैद्यकीय तपासणी केली जाईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
महानगर दंडाधिकारी लव्हलीन यांनी सहा वकील, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे एक प्राध्यापक व पाच पत्रकार यांना कक्षात येण्यास परवानगी दिली होती. प्रत्यक्षात पत्रकारांना कक्षात जाऊच देण्यात आले नाही, असा आरोप वृत्तवाहिन्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा