काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर बोलताना हल्लाबोल केलाय. मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही. त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असतील, तर मग त्यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करायला नको, असंही मत मांडलं. ते गोव्यात युवा स्पंदन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलत होते.
कन्हैया कुमार म्हणाले, “दोन दिवसांपासून टीव्हीवर सुरू आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली. २४ तास हेच सुरू आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडे तर ५६ इंचची छाती आहे, तर मग त्यांना घाबरण्याची काय गरज? हे म्हणतात पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असत नाहीत, देशाचे असतात. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतील, तर मग पंतप्रधानांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करायला नको.”
“पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही”
“जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक (SPG) त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते. हे अजिबात चालणार नाही,” असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.
“एकीकडे म्हणतात मजबूत पंतप्रधान आहेत आणि दुसरीकडे पळून जातात,” असं म्हणत कन्हैय्या कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला.
कन्हैया कुमार नेमके काय म्हणाले? संपूर्ण भाषण पाहा…
“पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न”
कन्हैया कुमार पुढे म्हणाले, “एका राज्यातील सर्व लोकांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. सुरक्षेतील त्रुटीचं निमित्त करून पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पंजाब आपल्या देशाचा भाग आहे. पंतप्रधानांचा कुठं कार्यक्रम असेल तर सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते. एसपीजीचा प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे.”
“आता ट्रक पाठवून ५०० रुपये देऊन तुम्ही गर्दी करू शकत नाही”
“ही सर्व नौटंकी आहे. यांना आधीपासून माहिती आहे की पंजाबमध्ये गावागावात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनाही गावात घुसू दिलं जात नाहीये. जेव्हा स्थानिक नेत्यांनाच येऊ दिलं जात नाही, तेव्हा पंतप्रधान मोदींना येऊ दिलं जाईल का? हे माहिती असूनही यांनी पंजाबमध्ये कार्यक्रम ठरवला. त्यांना वाटलं मिनाक्षी लेखी गेल्यात त्या ट्रक भरून लोकं गोळा करतील, पण लोक आलेच नाहीत. लोकांनी ७० वर्षांपासून लोकशाहीची चव चाखली आहे. त्यामुळे आता ट्रक पाठवून ५०० रुपये देऊन तुम्ही गर्दी करू शकत नाही. हे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, पंजाबमध्ये नाही,” असंही कन्हैया कुमार यांनी सांगितलं.