वकिलांच्या पथकाला जबाब; जेएनयूच्या आणखी एका विद्यार्थ्यांची चौकशी; दोघांची कोठडी वाढवली
पतियाळा हाऊस न्यायालयाच्या परिसरात १७ फेब्रुवारी रोजी आपल्याला पोलिसांसमोर वकिलांच्या वेशातील व्यक्तींनी जमिनीवर ढकलून बेदम मारहाण केली, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलांच्या चौकशी पथकाला सांगितले.
पोलिसांनी जेव्हा आपल्याला न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून आत आणले तेव्हा वकिलांच्या वेशातील व्यक्तींनी आपल्यावर हल्ला चढविला. ते हल्ल्याच्या तयारीतच आल्याचे दिसत होते आणि इतरांनाही बोलावत होते आणि आपल्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आपल्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली, असे कन्हैयाकुमार याने वकिलांच्या पथकाला सांगितल्याचे शनिवारी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आले.
कन्हैयाकुमार याला पतियाळा न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर कपिल सिब्बल, राजीव धवन, दुष्यंत दवे, एडीएन राव, अजितकुमार सिन्हा आणि हरेन रावल या सहा वकिलांच्या पथकाने १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या संकुलास भेट दिली.
दुसऱ्या प्रसंगात जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा तेथे पोलीस असूनही त्यांनी कोणतीही पावले उचलली नाहीत, असे कन्हैयाकुमार याने सांगितले. कन्हैयाने वकिलांच्या पथकाला हा प्रसंग सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकाराबाबतची माहिती घेतली.
न्यायालयाच्या संकुलात आपण हल्ला कसा होऊ दिला, पोलीस ताफा तेथे होता, ते काय करीत होते, कन्हैयावर न्यायालयाच्या कक्षाबाहेर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही न्यायालयाच्या कक्षात कसे येऊ दिले, असे सवाल वकिलांच्या पथकाने पोलीस उपायुक्तांना केले. याबाबत नरवाल म्हणाले की, संरक्षण पथकासह आपण तेथे आलो आणि न्यायालयाच्या कक्षाच्या शेजारी असलेल्या खोलीत गेलो.
त्यानंतर वकिलांच्या पथकाने अन्य पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि त्यांना या प्रसंगाबाबत माहिती विचारली. ज्या व्यक्तीने कन्हैयावर हल्ला केला, त्या व्यक्तीने आपण कन्हैयाचे वकील असल्याचे आम्हाला सांगितले, असे या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपल्यावर जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा आपण खाली पडलो आणि जखमी झालो, त्यामुळे तेव्हा पोलीस काय करीत होते ते पाहता आले नाही, असे कन्हैयाने पथकाला सांगितले. तेव्हा पोलीस तेथे होते आणि तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा त्याचा अर्थ होतो, असे सिब्बल यांनी पोलीस उपायुक्तांना विचारले.
ज्या व्यक्तीने आपल्यावर हल्ला केला तो न्यायालयाच्या शेजारच्या खोलीत आला आणि त्याने आपल्या शिक्षकांना याबाबत सांगितले. तेव्हा याच व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचे आपण आपल्या शिक्षकांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला आपली ओळख देण्यास सांगितले असता त्यानेच पोलिसांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती पोलिसांसमोरूनच निघून गेली आणि पोलिसांनी काहीही केले नाही, पोलिसांनी त्याला तेथेच पकडावयास हवे होते, या व्यक्तीनेच आपल्यावर हल्ला केला असल्याचे आपण पोलिसांना सांगितले, असे कन्हैयाकुमार म्हणाला.
उमर खालिद, अनिर्बनची कोठडी वाढवली
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जेएनयूच्या उमर खालिद व अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांची आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली.९ फेब्रुवारीला जेएनयूमध्ये अफजल गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ वादग्रस्त कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या या दोघांची या प्रकरणात आणखी तपासासाठी गरज असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केल्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीची मुदत दोन दिवसांनी वाढवली. यापूर्वी हे दोन विद्यार्थी मध्यरात्री शरण आल्यानंतर व पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती.
आणखी एका विद्यार्थ्यांची चौकशी
देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी पोलीस शोधात असलेला आशुतोष हा अन्य विद्यार्थी शनिवारी चौकशीत सहभागी झाला. पोलिसांनी त्याच्यावर समन्स बजावले होते. आशुतोष हा कन्हैयाकुमार याच्या आधी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता होता.