दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत आलेला कन्हैया कुमार बुधवारी हैदराबादला गेला आहे. हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला रोहित वेमुला आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे कन्हैयाने म्हटले आहे. हैदराबाद विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण असताना कन्हैयाला विद्यापीठात प्रवेश दिला जाण्याची शक्यता कमी आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच त्याला रोखण्यात येणार आहे.
रोहित वेमुलाने आत्महत्या केल्यानंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ देशभरात चर्चेत आले होते. रोहितच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर जेएनयूमध्ये एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण घडले. या कार्यक्रमाचा आयोजक कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या सर्व घटना घडल्यानंतर पहिल्यांदाच कन्हैया कुमार हैदराबादमध्ये जातो आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कन्हैया बुधवारी संध्याकाळी सहा वाजता हैदराबाद विद्यापीठात जाणार असून, तिथे तो भाषण करणार आहे. पण विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्याला विद्यापीठात प्रवेश करू दिला जाणार नसल्याची माहिती मिळते आहे. कन्हैया कुमार रोहित वेमुलाच्या आईलाही भेटणार आहे. या भेटीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
कन्हैया कुमारने मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.

Story img Loader