दिल्लीतील जेएनयूमध्ये ज्यांनी पाकिस्तानजिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र कोणावर अन्याय होता कामा नये, ही सरकारची जबाबदारी आहे. कन्हैयाकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले असते तर ते ठीक होते, पण त्वरित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून घाई केली असल्याचे मत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिर्डीत व्यक्त केले.
रोहित वेमुलाप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी व रोहितच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी करून आठवले म्हणाले, की भारताने पाकबरोबर आरपारची लढाई करून पाकव्याप्त काश्मीर काबीज केला पाहिजे. भारतात आतंकवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक वेळा उघड झालेले आहे. चर्चेतून पाकिस्तानचे सरकार ऐकत नसेल तर आरपारची लढाई करणे गरजेचे आहे. दलित विद्यार्थ्यांनी आंबेडकरवाद जोपासला पाहिजे. िहसक तसेच माओवादी होऊ नये, असे आवाहन आठवले यांनी केले. केंद्राने महाराष्ट्राला शेतकऱ्यांसाठी तीन हजार कोटी मदत केली असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, असे सांगताना विनोद तावडेंच्या पीएने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांला मारहाण केली त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता या गंभीर प्रश्नी आठवले अनभिज्ञ असल्याचे समोर आले. शेजारच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेत आठवलेंनी दोन्ही बाजूने संयम ठेवा, असा सल्ला देत तावडेंना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने २ ते २५ एप्रिल या कालावधीत समता रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या समता रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ‘जाती तोडो समाज जोडो’चा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आठवले यांची कविता
‘आपल्या महाराष्ट्रामध्ये पडल्यामुळे दुष्काळ..
माझ्या गळय़ात पडत नाही सत्तेची माळ..
म्हणून मी आता उठवणार आहे मुख्यमंत्र्यांच्या पुढे जाऊन जाळ..’