देशद्रोहाचा आरोप असलेला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने मंगळवारी सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी कन्हैयासोबत विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे एक शिष्टमंडळही होते. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणाबाजी केल्यावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी स्वतः जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेटही घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि विद्यापीठातील शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचे समजते. कन्हैया कुमारसह त्याचे इतर साथीदार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कन्हैया कुमार सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत आहे. सोमवारी त्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा यांची भेट घेतली होती.

Story img Loader