विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिला धमकावल्याप्रकरणी जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याच्यावर प्रशासनाने गेल्या वर्षी दंडात्मक कारवाई केली होती, असे आता उघडकीस आले आहे.
विद्यापीठाच्या संकुलात उघडय़ावर लघुशंका करू नये, असे सदर विद्यार्थिनीने कन्हैयाला सांगितले होते. त्यावेळी म्हणजेच १० जून २०१५ रोजी कन्हैया हा विद्यार्थी संघटनेचा नेता नव्हता. सदर विद्यार्थिनी सध्या दिल्ली विद्यापीठात शिक्षिका आहे. कन्हैयाने आपल्याशी गैरवर्तन केले आणि आपल्याला धमकी दिली होती असा आरोपी तिने केला आहे.
विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून जेएनयू प्रशासनाने चौकशी केली असता कन्हैया दोषी असल्याचे आढळले. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असे नमूद करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र कन्हैयाच्या कारकिर्दीचा विचार करून कुलगुरूंनी सौम्य भूमिका घेतली होती.
कन्हैया कुमार याला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि भविष्यात अशा प्रकारचे वर्तन न करण्याची तंबीही देण्यात आली होती.
अन्नातून विषबाधा झाल्याने काश्मीरमध्ये दोन भावांचा मृत्यू
पीटीआय, जम्मू
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्य़ातील एका कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापैकी दोघे भाऊ मरण पावले.
राजौरी जिल्ह्य़ात कालाकोट परिसरातील मोरा दुर्गा खेडय़ातील एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुले दूषित आहाराचे सेवन केल्याने मरण पावली असून अन्य आजारी पडल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली.
सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विषबाधा झालेल्या सहा जणांपैकी इम्तियाज (६) आणि इरफान (३) मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित चार सदस्यांवर उपचार सुरू असून गुन्हा नोंदविल्यानंतर घटनेची चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा