तुम्हाला संसदेत राष्ट्रवादावर चर्चा करण्यासाठी निवडून दिलेले नसून, देशाचा विकास करण्यासाठी निवडून दिले आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने, ‘मन की बात’मधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल, दिल्लीत आणि धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्यांबद्दलही बोला, असाही टोला मोदींना लगावला.
पुरोगामी विद्यार्थी संयुक्त समितीतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैया कुमारच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाऊण तासाच्या भाषणामध्ये कन्हैयाने नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिदुत्त्ववादी संघटनावर चौफेर टीका केली.
तो म्हणाला, सगळ्यांना समानतेचा हक्क मिळावा, यासाठीच आमची लढाई सुरू आहे. आम्ही कोणत्याही जुमलेबाजीबद्दल बोलत नाही, आमच्याकडे विकासाचा कार्यक्रमही तयार आहे. देशभरात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना कायम केले पाहिजे. एकाच स्वरुपाचे काम करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये दुजाभाव का, हा आमचा प्रश्न आहे. जर कंत्राटी पद्धतीने काम हाच उपाय असेल, तर मग संसदेचेही कंत्राटीकरण करा, अशा नेत्यांची आम्हाला गरज नाही.
तुम्ही नुसती नाव बदला आम्ही समाज बदलण्यासाठी आलो आहोत, असे सांगून तो म्हणाला, जाती, भाषेच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे काम केले जात आहे. पण शोषक समाजाविरुद्ध शोषित एकत्र आले नाहीत, तर हे लोक राज्यघटना जाळायलाही कमी करणार नाहीत. पण आम्ही आता संघटित होऊ लागलो आहोत. संघटितपणेच आम्ही मनुवादाला विरोध करू आणि मनुवादाला मानणारे शासन चालू देणार नाही, असा इशारा त्याने यावेळी दिला.
आम्हाला जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल, तितके आम्ही आणखी उफाळून वर येऊ. मोदी तर पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे सत्ता आहे. पण मग त्यांना आम्ही आमचे विचार मांडले तर इतकी भीती का वाटते. तुमच्या हल्ल्यांनी आम्ही कधीच घाबरणार नाही. एक रोहित वेमुला गेल्यानंतर आता आणखी कोणी जाणार नाही. समाजात असंख्य रोहित तयार होत राहतील. माझ्यावर हल्ला करणारे आमचे साथीच आहेत. पण त्यांची माथी भडकवली जात आहेत. ते रस्त्यावर येऊन कधी आपला हक्क मागतात, त्याची आम्ही वाट पाहतोय, असेही कन्हैया म्हणाला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मेधा पानसरे, अमोल पालेकर, संध्या गोखले, भालचंद्र कांगो आदी नेते रंगमंदिरात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रंगमंदिराच्या परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. या परिसराला छावणीचेच स्वरुप आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा