जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ फेब्रुवारीला अफझल गुरूच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी गुरुवारी बेमुदत उपोषण सुरू केले.
उपोषणाला बसलेल्यांपैकी पाचजण अ. भा. विद्यार्थी परिषदेचे असून, विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासह इतर २० विद्यार्थी वेगवेगळ्या गटांचे आहेत.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले कन्हैया, उमर खालिद व अनिर्बन भट्टाचार्य हे तिघे सध्या जामिनावर आहेत.
पाच सदस्यांच्या तपास पथकाने केलेल्या शिफारशींच्या आधारावर या आठवडय़ाच्या सुरुवातीला विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या होत्या.
कन्हैयाला दंड करण्यात आला असून दोन विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तर दोन माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात येण्याची मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्री प्रशासकीय भवनातील गंगा धाबा येथून मशाल मोर्चा काढल्यानंतर उपोषणाला सुरुवात झाली. ‘परीक्षेच्या काळात कारवाई केल्यास विद्यार्थी विरोध करणार नाहीत असा विचार प्रशासनाने केला. मात्र आम्ही उपोषणाला बसलो असतानाही पेपर लिहू शकतो आणि परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो’, अशी प्रतिक्रिया कन्हैयाने दिली.
ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असेही काही विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांसोबत एकजूट दर्शवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

Story img Loader