दिल्लीतल्या कंझावाला या भागात १ जानेवारी २०२३ या दिवशी २० वर्षांच्या अंजली सिंहचा मृतदेह छिनविछिन्न आणि नग्न अवस्थेत आढळला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत ही घटना घडल्याने संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. आता या प्रकरणी दिल्लीतल्या रोहिणी कोर्टाने गुरुवारी चार आरोपींवर हत्येचा गुन्हा निश्चित केला आहे. यामुळे या प्रकरणी आता चारही आरोपींवर हत्येचा खटला चालवला जाणार आहे.
दिल्लीतल्या कंझावाला भागात या तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. अंजलीला १३ किमी फरपटत नेलं गेलं. पहाटे साधारण ३.१५ च्या सुमारास एका वाटसरुने अंजलीला फरपटत नेणारी कार पाहिली. त्यानंतर ३.२४ ला पोलिसांना त्याने कळवलं. या सगळ्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास दिल्ली पोलिसांना तिचा मृतदेह आढळून आला. एवढंच नाही तर पोलिसांना अंजलीची स्कुटीही अपघात झालेल्या अवस्थेत आढळून आली.
काय घडली घटना?
दिल्लीत १ जानेवारीच्या दिवशी पहाटे चार वाजता ही अंजलीच्या अपघाताची घटना समोर आली. पोलिसांना कंझावाला भागात या तरूणीचा विवस्त्रमृतदेह आढळला होता. आदल्या दिवशी रात्री म्हणजेच ३१ डिसेंबरला घरातून अंजली सहा वाजता बाहेर पडली होती आणि मी लवकरच घरी येते असं तिने आईला सांगितलं होतं. मात्र तिचा मृतदेहच मिळाला. तोदेखील छिनविछिन्न अवस्थेत आणि विवस्त्र अवस्थेत.
दिल्लीत कंझावाला प्रकरणाची पुनरावृत्ती, हॉर्न वाजवण्यावरुन वाद, तरुणाला अर्धा किमीपर्यंत फरपटत नेल्याचा Video व्हायरल
अंजली सिंह, असं मृत्यू झालेल्या २० वर्षीय तरुणीचं नाव आहे. एका कारने अंजलीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कार न थांबवता चालकाने अंजलीला सुलतानपूरी ते कंझावालापर्यंत फरपटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. याप्रकरणी मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात अंजलीचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यामध्ये अंजलीचा मृत्यू गंभीर जखमांमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.