दिल्लीतल्या कंझावाला भागात तरूणीला १२ किमी फरपटत नेल्याचं आणि तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण १ जानेवारीला समोर आलं. हा अपघात इतका भीषण होता की या मुलीच्या अंगावरचे सगळे कपडे फाटले. ३१ डिसेंबरला आपल्या आईला सांगून अंजली ही मुलगी दिल्लीतल्या तिच्या घरातून बाहेर पडली होती. मात्र ती परतलीच नाही. अपघात होण्याआधी ती आणि तिची मैत्रीण पार्टी करत होती ही बाब समोर आली आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं अंजलीच्या मित्रानेच सांगितलं आहे.
अंजलीचा मित्र नवीन याने काय सांगितलं?
ANI शी बोलताना अंजलीचा मित्र नवीन म्हणाला की त्यादिवशी (३१ डिसेंबर) अंजली आणि तिची मैत्रीण निधी दोघी पार्टी करत होत्या. त्यांच्यासोबत आम्ही काही मित्रही होतो. थोडा वेळ झाला आणि त्या दोघींचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. निधीने अंजलीकडे पैसे मागितले होते. त्यानंतर अंजलीने तिच्याकडे चावी मागितली होती. या दोघींचा वाद एवढा विकोपाला गेला की दोघींनी एकमेकींना मारायला सुरूवात केली. आम्ही त्या दोघींना वेगळं केलं. त्यानंतर अंजलीला शांत व्हायला सांगितलं. निधी खाली गेली आणि तिने तमाशाच केला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती आम्हाला दिली. त्यानंतर निधीला शांत करायला अंजली खाली आली. पण तिथेही त्यांचं भांडण झालं. आम्ही तिथे पोहचलो तोपर्यंत त्या दोघी स्कुटीवरून निघाल्याही होत्या असं नवीने सांगितलं आहे.
अंजली सिंहचा ३१ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत मृत्यू
अंजली सिंह या मुलीचा ३१ डिसेंबरच्या रात्री अपघाती मृत्यू झाला. ती स्कुटीवर चाललेली असताना तिला एका कारने धडक दिली. त्या धडकनेनंतर तिला या कारने १२ किमी फरपटत नेलं. त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणात आता विविध खुलासे समोर येत आहेत. १ जानेवारीला जेव्हा ही माहिती समोर आली होती तेव्हा अंजली स्कुटीवर एकटीच होती हे समजलं होतं. त्यानंतर अंजलीची मैत्रीण निधी तिच्यासोबत होती ही बाब समोर आली. मी दहा वाजेपर्यंत घरी येते असं सांगून अंजली आपल्या घरून निघाली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच १ जानेवारीला पोलिसांना तिचा विवस्त्र मृतदेह आढळला. हा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत आढळून आला.
अंजलीच्या आईने केली निधीच्या चौकशीची मागणी
अंजलीच्या आईने अंजलीची मैत्रीण निधी हिचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या रात्री काय घडलं होतं ते माहित नसल्याने आणि निधी तिच्यासोबत असल्याने पोलिसांनी निधीचीही चौकशी करावी असं अंजलीच्या आईने म्हटलं आहे. आता अंजलीच्या मित्राने त्या रात्री म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री निधी आणि अंजली यांच्यात बाचाबाची आणि मारामारी झाली होती असं सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणी काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दिल्लीतील अपघात प्रकरणी अंजली सिंह हिला फरफटत नेणारा ‘चालक’ हा अपघातावेळी स्वत:च्या घरी असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी दीपक खन्ना याने पोलिसांना आपण गाडी चालवित असल्याचे सांगितले होते. मात्र तपासात त्याच्या फोनचे अपघातावेळी स्थळ वेगळे दिसत होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता दीपकच्या भावांनी त्याला अपघातस्थळी बोलावून गाडी चालवत असल्याचे कबुल करण्यास सांगितले. कारण अपघातावेळी गाडीत असलेल्या कुणाकडेच वाहन परवाना नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.