पीटीआय, बंगळूरु

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या कर्नाटकमध्ये आपण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समर्थनार्थ प्रचार करू, असे ‘किच्चा सुदीप’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे आघाडीचे कन्नड चित्रपट अभिनेते सुदीप संजीव यांनी बुधवारी जाहीर केले. यामुळे १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपचा प्रचार ‘तारांकित’ होणार आहे.

सुदीप आपल्याला पाठिंबा देणार याचाच अर्थ तो भाजपचा प्रचार करेल, असे बोम्मई यांनी सांगितले.राज्यात प्रचंड संख्येत चाहते असलेले सुदीप हे कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. आपण राजकारणात प्रवेश करत नसून निवडणूकही लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नसल्याचेही संकेत त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांबद्दल आपल्याला जिव्हाळा आणि आदर आहे, असे सुदीप म्हणाले. आपल्या कठीण काळात बोम्मई आपल्यासोबत राहिल्याची आठवण करतानाच, आपला त्यांच्या कुटुंबीयांशी जवळचा संबंध असल्याचे सांगून त्यांनी बोम्मई यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. ४९ वर्षांचे सुदीप यांनी अनेक प्रसिद्ध कन्नड चित्रपटांशिवाय हिंदी, तेलगू व तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

जनता दलाचे माजी खासदार भाजपमध्ये

नवी दिल्ली: धर्मनिरपेक्ष जनता दलाचे माजी खासदार एल. आर. शिवरामे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील व सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. येत्या दिवसांत अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा शिवरामे यांनी केला. शिवरामे यांना जनता दलातून निलंबित करण्यात आले होते.