पीटीआय, बंगळुरू
कर्नाटकातील बेळगाव येथे गेल्या महिन्यात एका सरकारी बस वाहकाला मराठी भाषा येत नसल्याच्या कारणावरून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक गटांनी शनिवारी राज्यात १२ तासांचा बंद पुकारला.
या वेळी ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. बंद दरम्यान, कन्नड समर्थक गटांनी राज्याच्या अनेक भागांमध्ये निदर्शने केली. राजधानी बंगळुरूमध्ये म्हैसूर चौक आणि बीएमटीसी आणि केएसआरटीसी बसस्थानकावर कामगारांनी निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले. म्हैसूरमध्ये कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी बसस्थानकावर बस थांबवून आंदोलन केले. बेंगळुरू आणि राज्याच्या इतर भागांकडे जाणाऱ्या बसेस थांबवण्यासाठी त्यांनी सीमेजवळ धरणेही दिले.