Israel-Made Time Machine Couple Scam: ‘अशी ही बनवाबनवी’ या मराठी सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटातील एका प्रसंगात अभिनेते अशोक सराफ हे घरमालकाला इस्रायलवरून मधुमेहावरील औषध आणण्याचं आश्वासन देऊन पैसे उकळताना दिसतात. इस्रायल आणि त्यांचे विविध शोध याबद्दल भारतीय जनमाणसात एकप्रकारचं आकर्षण पाहायला मिळतं. याच आकर्षणाचा फायदा घेऊन उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका दाम्पत्यानं वृद्धांना तरूण बनविण्याची योजना सांगितली. इस्रायलमधील टाइम मशीनचा वापर करून ६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांवर आणून ठेवण्याचं आमिष दाखवत या दाम्पत्यानं तब्बल ३५ कोटी रुपये लुबाडले. पण फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आता अनेकांनी पुढे येऊन याची तक्रार दाखल केली आहे.

कानपूर पोलिसांनी दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला असून फरार झालेल्या ‘बंटी-बबली’चा शोध सुरू केला आहे.

प्रकरण काय आहे?

कानपूरच्या एका भागात दाम्पत्यानं रिव्हाइवल वर्ल्ड नावाचं थेरपी सेंटर उघडलं होतं. या सेंटरमध्ये ते वृद्धांना तरूण बनविण्याचं आश्वासन देऊन थेरपी देत होते. या दाम्पत्यानं प्रचार केला की, त्यांनी इस्रायलवरून एक टाइम मशीन आणली आहे, ज्याद्वारे ते ऑक्सिजन थेरपी देऊन ६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांच्या तरुणामध्ये बदलतील. भारतातील प्रदूषणामुळं आपली हवा खराब झाली आहे. ज्यामुळं लवकर वृद्धत्व येत आहे. ऑक्सिजन थेरपी देऊन काही महिन्यात वृद्धांना तरुण करू, असे आश्वासन त्यांनी दिलं.

हे वाचा >> मंदिरातील मूर्ती चोरल्यानंतर मुलगा आजारी पडला, माफिनामा लिहित चोर म्हणाला…

लुबाडणूक कशी केली?

दाम्पत्यानं एका थेरपी सेशनसाठी सहा हजार रुपये आकारले होते. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाचा फंडा वापरून त्यांनी ग्राहकांची साखळी बांधली. जे लोक नव्या ग्राहकांना जोडतील, त्यांना मोफत थेरपी सेशन देण्यात येत होते. यामध्ये कानपूर शहरातील अनेक नामवंत लोक जोडले गेले. या सर्व लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा झाल्यानंतर दाम्पत्यानं पळ काढला.

रिव्हाइवल थेरपी चालविणारे राजीव कुमार दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे हे सध्या फरार आहेत.

एनडीटीव्हीनं फसवणूक झालेल्या काही ग्राहकांशी बातचीत केली. त्यात रेनू नावाच्या एका ग्राहक महिलेने सांगितलं की, आम्ही त्या दाम्पत्याच्या आमिषाला बळी पडलो. त्यांनी शहरात एक आलिशान थेरपी सेंटर उघडलं होतं. तिथे इस्रायलहून २५ कोटी रुपयांची टाइम मशीन आणली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी विविध स्किम समोर ठेवल्या होत्या. सहा लाखांपासून ते ९० हजार रुपयांची गुंतवणूक करायची आणि ग्राहक जोडायचे, जेणेकरून मोठा परतावा मिळेल आणि मोफत उपचारही मिळतील, असे आमिष दाखवलं गेलं. पण आम्हाला ऑक्सिजन थेरपीचे उपचार कधीच मिळाले नाहीत.