Kanpur : बॉलीवूड चित्रपट ‘दृश्यम’ मध्ये दाखवलेल्या कथेप्रमाणे एक धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. एक महिला चार महिन्यांपासून बेपत्ता झाली होती. या महिलेचा तपास पोलीस तब्बल चार महिन्यांपासून करत होते. मात्र, तपास लागत नव्हता. या घटनेतील आरोपी देखील फरार होता. आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु होता. पण आरोपी पकडण्यात यश येत नव्हते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा आता थेट चार महिन्यांनी उलगडा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार महिन्यांपूर्वी एका व्यावसायिकाच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह कानपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या एका ‘व्हिआयपी’ क्लबच्या आवारात पुरण्यात आल्याच्या आरोपाखाली एका जिम ट्रेनरला शनिवारी पोलिसांनी अटक केली. हा आरोपी जूनपासून फरार होता आणि पंजाबमध्ये तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. या आरोपीचं नाव विमल सोनी (३५) असं असून याला पोलिसांनी अटक केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी ३२ वर्षीय पीडितेचा मृतदेह बाहेर काढला आहे. या धक्कादायक घटनेच गूढ उकललं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : Srinagar Attack : श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, सहा जण जखमी

दरम्यान, या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ती महिला शेवटची २४ जून रोजी जिममध्ये गेली होती आणि तेव्हापासून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीने विमल सोनी याच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणासंदर्भातील माहिती देताना डीसीपी श्रवण कुमार यांनी सांगितलं की, “आरोपी विमल याला शोधण्यात पोलिसांना अडचण आली. कारण तो त्याचा फोन वापरत नव्हता किंवा तो कोणताही आर्थिक व्यवहार करत नव्हता. काही दिवसांपूर्वी आरोपीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.”

“आरोपीच्या तपासासाठी अनेक टीम दिल्ली, पुणे, आग्रा, ग्वाल्हेर आणि पंजाब येथे पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, असे आढळून आले की आरोपी काही काळ पंजाबला गेला, जेथे त्याने हॉटेलमध्ये काम केलं. त्याने हॉटेलचे मालक आणि कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी त्याने कानपूरमधील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याला अटक केली”, अशी माहिती डीसीपी श्रवण कुमार यांनी दिली.

दरम्यान, सुरुवातीला आरोपीने महिलेचा मृतदेह गंगेत फेकल्याचा दावा केला. मात्र, नंतर व्हीआयपी रोडवरील ऑफिसर्स क्लबच्या आवारात मृतदेह पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) हरीश चंदर यांच्या देखरेखीखाली घटनास्थळाचे उत्खनन केले आणि मृतदेह बाहेर काढला. यावेळी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की त्याचे त्या महिलेशी प्रेम संबंध होते. पण २४ जून रोजी आरोपीचे लग्न ठरल्याचे समजल्यानंतर त्यांच्या कारमध्ये दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात आरोपीने त्या महिलेवर हल्ला केला. त्यातच महिलेचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्याने एका व्हिआयपी ऑफिसर्स क्लबमध्ये तिचा मृतदेह पुरला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur crime news shocking gym trainer killed woman and buried body in vip area accused arrested gkt