वेळीच उपचार न मिळाल्याने कानपूरमध्ये १२ वर्षाच्या मुलाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयातून साधे स्ट्रेचरही न मिळाल्याने वडिलांना आजारी मुलाला खांद्यावर घेऊन दुस-या रुग्णालयात जावे लागले. मात्र या दरम्यान उपचारासाठी विलंब होत गेला आणि शेवटी त्या चिमूरड्याचा अंत झाला. ओडिशामध्ये पत्नीचा मृतदेह खांद्यावर नेणा-या दाना मांझीपाठोपाठ कानपूरमध्येही अशीच घटना समोर आल्याने देशभरातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडेच निघाले आहेत.
कानपूरमध्ये राहणा-या सुनील यादव यांचा १२ वर्षाचा मुलगा अंश हा तापाने फणफणला होता. मुलाचा ताप वाढत असल्याने सुनील यांनी मुलाला घराजवळील रुग्णालयात नेले. मात्र अंशची खालावलेली प्रकृती बघून रुग्णालय प्रशासनाने त्यांना कानपूरच्या लाला लजपत राय या सर्वात मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. सुनील यादव मुलाला घेऊन लाला लजपतराय रुग्णालयात गेले. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार सुनील यादव यांना तब्बल अर्धा तास डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागले. शेवटी सुनील यादव यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना मुलाला तपासण्याची विनंती केली. मग लजपतराय रुग्णालयातील डॉक्टरांनी अंशला काही अंतरावर असलेल्या लहान मुलांच्या रुग्णालयात न्यावे लागेल असे सांगितले. पण तिथे जाण्यासाठी यादव यांना रुग्णवाहिका सोडा पण साधे स्ट्रेचर देण्याची तसदीही रुग्णालयाने दाखवली नाही. शेवटी मुलाला खांद्यावर घेऊन सुनील यादव लहान मुलांच्या रुग्णालयात गेले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत अंशचा मृत्यू झाला.
लाला लजपात रुग्णालयातील अधिका-यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी ओडिशातील दाना मांझी यांना रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन गावी जावे लागले होते. तब्बल १० किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी कापले होते. आता कानपूरमध्येही वेळीच उपचार न मिळाल्याने एका मुलाचा जीव गेला आहे. जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात ११ हजार नागरिकांमागे अॅलोपेथीचा एक डॉक्टर आहे. यावरुन देशातल्या आरोग्य व्यवस्था आणि सुविधेची अवस्था काय हे मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ना स्ट्रेचर, ना रुग्णवाहिका: उपचारातील विलंबामुळे मुलाचा मृत्यू
वेळीच उपचार न मिळाल्याने कानपूरमध्ये १२ वर्षाच्या मुलाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-08-2016 at 16:48 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur hospital denied to admit and strature son died on father shoulder