मुस्लीम समाजातील अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यासाठी हिंदू मुलाने धर्मांतर केला असल्याचा प्रकार कानपूरमध्ये उजेडात आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये या त्यांचा निकाह होताना दिसत आहे. कानपूर जिल्ह्यातील चौबेपूर येथील हे जोडपे असून ते आता अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
चौबेपूर पोलीस ठाण्याचे अधिक्षक संजय पांडे म्हणाले की, “या जोडप्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हिडीओमध्ये निकाह होत असल्याचे विधि दिसत असून हा व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचा आहे.”
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा नियोजक विपिन शुक्ला यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच, या धर्मांतर प्रक्रियेत जे सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. “एका हिंदू मुलाचे धर्मांतर करून त्याने मु्स्लीम अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे”, असंही विपिन शुक्ला म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा प्रकार चार महिन्यांपूर्वीचा आहे. हिंदू मुलगा आणि अल्पवयीन मुस्लीम मुलगी एकमेकांच्या शेजारी राहत होते. चार महिन्यांपूर्वी या दोघांनीही पलायन केले. सुरुवातीला त्यांनी हिंदू पद्धतीनुसार विवाह केला. परंतु, त्यानंतर मुलाचं धर्मांतर करण्यात आलं आणि मग पुन्हा लग्न लावण्यात आलं. दरम्यान, मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाली असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.