दोन स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर उभं राहून रील तयार करणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाला २२ हजारांचा दंड ठोठाटावला आहे. जर दंड भरला नाही तर दोन्ही गाड्या जप्त केल्या जातील असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे की ज्या स्कॉर्पिओ कार्सवर आम्ही दंड ठोठावला आहे त्या कार्सची आधीच्या दंडाचीही थकबाकी आहे.
पोलिसांनी याबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही स्कॉर्पिओंच्या नंबर प्लेटही बेकायदेशीर आहेत. या दोन स्कॉर्पिओ सुरु असताना बोनेटवर बाय देऊन अजेंद्र सिंह नावाच्या माणसासाने अजय देवगणसारखा स्टंट केला. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन स्कॉर्पिओंपैकी एका कारवर पाच हजार रुपयांचा दंड भरणं बाकी आहे तर दुसऱ्या कारने विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय त्यामुळे त्या कारवर १५ हजार ६०० रुपयांचे पाच दंड बाकी आहेत. या संपूर्ण प्रकारणी डिसीपी प्रमोद कुमार यांनी म्हटलं आहे की एमव्ही कायद्यानुसार दोन्ही कार्सना दंड ठोठवण्यात आला आहे. जर दंड भरला गेला नाही तर दोन्ही कार आम्ही जप्त करु.
काय घडली घटना?
दोन स्कॉर्पिओ कार्स सुरु असताना त्यांच्या बोनेटवर एक तरुण उभा राहिला. तो जीवघेणा स्टंट करत होता. अजय देवगण स्टाईलचा हा स्टंट या तरुणाने २२ जानेवारीच्या दिवशी केल्याचं सांगितलं जातं आहे. या तरुणाच्या हातात भगवा झेंडा होता. तसंच कारमध्ये धार्मिक गाणी लावण्यात आली होती. भगव्या रंगाचं धोतर आणि तसंच उपरणं घेऊन या तरुणाने हा स्टंट केला ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. काही ठिकाणी सुरुवातीला पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सोशल मीडियावर जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही कार्सना दंड ठोठावला आहे. २२ हजार ५०० रुपयांचा हा दंड भरला गेला नाही तर दोन्ही कार जप्त केल्या जाणार आहेत. अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत असताना कानपूरमध्ये या तरुणाने हा स्टंट केला. तसंच हा तरुण जय श्रीराम या घोषणा देत होता. हा व्हिडीओ Akshaysengar.12 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आणि नंतर व्हायरल झाला. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
व्हीडिओत काय दिसतं आहे?
एक तरुण भगव्या रंगाचं धोतर नेसून आणि उपरणं घेऊन दोन स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर पाय देऊन उभा आहे. त्या कारमध्ये गाणं वाजतं आहे. तसंच हा तरुण हातात रामाचं चित्र असलेला झेंडा घेऊन उभा आहे. हा झेंडा तो फडकवतो आहे. स्कॉर्पिओ कार सुरु असताना तो हे सगळं करतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की तरुणाचा जर तोल गेला असता तर त्याचा अपघात झाला असता.