मोदींवर खोटारडेपणाच्या राजकारणाचा आरोप
गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे खोटारडेपणाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री कपिल सिब्बल यांनी केला असून व्यक्तीगत मुद्दय़ांपेक्षा देशासाठी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर वादविवादासाठी त्यांनी आमने-सामने यावे, असे आव्हानही मोदी यांना दिले आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काळा पैसा वापरला जात असून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या सभा होतात त्या स्टेडियमवर १० ते १५ कोटी खर्च करण्यात आला. हा कुठला पैसा आहे याची चौकशी झाली पाहिजे असे कायदा मंत्री सिब्बल यांनी त्यांच्या व्यक्तीगत संकेतस्थळाचा शुभारंभ करताना सांगितले. मोदी ज्या मंचावरून भाषण करतात त्याभोवती कॅमेरे असतात. जर तुम्हाला अडवाणीजी म्हणतात त्याप्रमाणे जर खरेच काळा पैसा परत आणायचा असेल तर स्टेडियमवर १० ते १५ कोटी रुपये खर्च केले जातात, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, अशा मोठय़ा सभांसाठी पैसा कुठून येतो याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपनेही त्यांना लगेच उत्तर दिले असून आमचे नेते अरूण जेटली सिब्बल म्हणतात त्याप्रमाणे वादविवादाचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर कपिल सिब्बल असे म्हणाले की, जेटली पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील तेव्हा त्यांच्याशी आपण जाहीरपणे असा वादविवाद करण्यास तयार आहोत आता नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे यूपीएविषयी खोटी माहिती पसरवित आहेत असा आरोप करून सिब्बल म्हणाले की, ते आमचे कायमचे विरोधक (निरंतर विरोधी) आहेत , ते खोटोरडेपणाचे राजकारण करीत आहेत. ज्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे त्यावर होत नाही, भाजपकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते व्यक्तींवर बोलतात, एक व्यक्ती देशाचे भवितव्य कधीही घडवू शकत नाही. देशाचे भवितव्य धोरणांवर ठरते आरोपांवर नाही, दुर्दैवाने देशात व्यक्तीविषयी चर्चा जास्त होत़े
मोदी पत्रकार परिषदा का घेत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त करून ते सिब्बल म्हणाले की,  मोदी यांना नियंत्रित प्रेक्षक हवे असतात व त्यामुळे ते त्यांचा खोटारडेपण खपवून नेऊ शकतात. मोदींना इतिहास माहीत नाही, अॅलेक्झांडर कधीच गंगेच्या प्रदेशात पोहोचला नव्हता. चंद्रगुप्त मौर्य हा गुप्त घराण्यातला नव्हता तो पाकिस्तानात असलेल्या तक्षशिलेतील होता व पाटण्यातील नव्हता, ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास काय निर्माण करणार असा सवाल त्यांनी केला.
भाजपची एकीकडे शिवेसनेशी मैत्री आहे व दुसरीकडे बिहारच्या लोकांवर प्रेम आहे त्याबाबतही त्यांनी टीका केली. जर त्यांना बिहारच्या लोकांचा एवढा कळवळा असेल तर महाराष्ट्रात बिहारींना राहण्यास विरोध करणाऱ्या शिवसेनेशी युती त्यांनी तोडावी, असेही सिब्बल म्हणाले.
चीन त्यांच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या वीस टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते असे मोदी यांनी एका सभेत सांगितले. त्यावर सिब्बल म्हणाले की, प्रत्यक्षात चीन त्यांच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या चार टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते. एनडीएच्या काळात कृषी वाढ १.८४ टक्के होती, यूपीएच्या काळात ती ३.४३ टक्के आहे. एनडीएच्या काळात आर्थिक तूट ५.३२ टक्के होती, यूपीएच्या काळात ती ४.६८ टक्के आहे. महसुली तूट एनडीएच्या काळात ४ टक्के होती ती यूपीएच्या काळात ३.१४ टक्के झाली़ बचतीचा दर एनडीएच्या काळात २५.६४ टक्के इतका होता तो यूपीएच्या काळात ३३.०२ टक्के झाला. सरासरी गुंतवणूक एनडीएच्या काळात २५.१६ टक्के होती ती यूपीएच्या काळात ३५.४४ टक्के झाली. औद्योगिक वाढ एनडीएच्या काळात ५.६४ टक्के होती ती यूपीएच्या काळात ७.५ टक्के झाली, असे सिब्बल म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनडीएपेक्षा चांगली कामगिरी
काँग्रेस प्रणित यूपीएने, भाजप प्रणित एनडीएपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याची कागदपत्रे सादर करताना ते म्हणाले की, देशात थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे आणि वाढत आहे, जर यामुळे देश उद्ध्वस्त होणार असेल तर भाजपने कायम विरोधात बसावे त्यामुळे देशाची प्रगतीच होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sibal hints at use of black money in narendra modis rallies seeks probe