पीटीआय, नवी दिल्ली

विरोधी पक्षांची एकजूट असलेली ‘इंडिया’ आघाडी एकसंध असली पाहिजे, सामान्यत: दिसते तशी विखुरलेली नाही, असे मत राज्यसभा सदस्य कपिल सिबल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले. यासोबतच सिबल यांनी विरोधकांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकेल, अशा विरोधकांच्या आघाडीला वैचारिक चौकटीची गरज असल्याचेही ते म्हणाले.

आघाडीतील मित्र पक्षांमधील मतभेदांवर ते भाष्य करीत होते. ‘इंडिया’ आघाडीत सहभागी पक्षांना भविष्यात सुसंगत धोरण, वैचारिक चौकट आणि कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे सिबल म्हणाले. देशातील निवडणूक आयोग अकार्यक्षम आणि अयशस्वी संस्था असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्याच्या पद्धतीत एकसमानता असली पाहिजे आणि जोपर्यंत आघाडीकडे आपले विचार मांडणारे प्रवक्ते मिळत नाहीत तोपर्यंत ती फार प्रभावीपणे पुढे जाऊ शकत नाही.– कपिल सिबल, खासदार, राज्यसभा