देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या Kappa Variant चे रुग्ण सापडू लागले आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचे उपाय योजले जात आहेत. मात्र, हा फक्त करोनाचा एक प्रकार असून त्यावर उपचार शक्य आहेत, त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असं उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात डेल्टाचे १०७ रुग्ण
लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये Kappa Variant आढळून आला असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे १०७ रुग्ण आढळून आल्यानंतर आता कप्पा व्हेरिएंटचे रुग्ण देखील सापडले आहेत.
‘करोनाची लस नाय, तर जॉब नाय’; ‘या’ सरकारनं घेतला कठोर निर्णय
कप्पा विषाणूवर उपचार शक्य
दरम्यान, याआधी देखील उत्तर प्रदेशमध्ये कप्पा विषाणूचे रुग्ण सापडल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे. “याआधी देखील कप्पा व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आले होते. हा व्हायरल अद्याप चिंतेचं कारण नाही. हा करोना विषाणूचा व्हेरिएंट आहे आणि त्यावर उपचार करणं शक्य आहे”, असं प्रसाद यांनी सांगितलं आहे. मात्र, कप्पा व्हेरिएंटचे हे रुग्ण नेमके राज्याच्या कोणत्या भागात सापडले, याची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, कप्पा विषाणूची रुग्णसंख्या अत्यल्प असली, तरी डेल्टा आणि अल्फाप्रमाणेच कप्पा विषाणू देखील वेगाने प्रसार होणारा असल्याचं सांगितलं जात आहे.
Two cases of Kappa variant of COVID-19 detected in Uttar Pradesh: Official statement
— Press Trust of India (@PTI_News) July 9, 2021
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२०मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत WHO नं हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.