करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याची भररस्त्यात चाकुने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. रोहित सिंह राजपूत असे या घटनेत मृत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. रोहित हे इटारसी शहराचे करणी सेनेचे सचिव होते. भोपाळमधील महापालिकेच्या कार्यालयासमोर त्यांची तीन जणांनी शुक्रवारी रात्री हत्या केली.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात गमावला जीव
या घटनेदरम्यान रोहित यांच्या बचावासाठी पुढे आलेला त्यांचा मित्र सचिन पटेललाही हल्लेखोरांनी चाकुने भोसकले आहे. घटनेनंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान रोहित यांचा मृत्यू झाला. सचिन पटेल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जुन्या वादातून रोहित यांची हत्या करण्यात आली आहे. “रोहित आणि त्यांचा मित्र शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका चहाच्या दुकानाजवळ उभे होते. यावेळी मोटारसायकलने आलेल्या तिघांनी पीडितांसोबत वाद घातला. पुढे या वादाचे रुपांतर मारामारीत झाले”, अशी माहिती इटारसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आर. एस. चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणातील तिनही आरोपी राहुल राजपूत, अंकित भट आणि इशू मालविय यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी अंकित भट यांचे घर उपविभागीय दंडाधिकारी मदन रघुवंशी यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले होते. अन्य दोन आरोपींची घरे देखील प्रशासनाकडून पाडण्यात येणार होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.