बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचं आहे’, असं म्हणत करिनाने काँग्रेसकडून भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली.

‘चित्रपट हेच माझं ध्येय आहे, मी निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त पूर्णतः निराधार आहे. मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही’, असं 38 वर्षीय अभिनेत्रीने स्पष्ट केलं.

‘भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून झालीये, परिणामी जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. पण आता खुद्द करिनानेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Story img Loader