हितेश कुमार फक्त सहा वर्षांचा होता जेव्हा त्याचे वडिल लान्सनायक बचन सिंह कारगिल युद्धात शहीद झाले होते. बचन सिंह राजुपाताना रायफल्सच्या सेकंड बटालियनमध्ये होते. १२ जून १९९९ च्या रात्री ते शहीद झाले. जेव्हा हितेशने आपले वडिल शहीद झाल्याची बातमी ऐकली तेव्हाच त्याने आपण मोठे झाल्यावर लष्कराच भरती होणार अशी शपथ घेतली होती.

बरोबर १९ वर्षांनी हितेशची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. देहरादून येथे भारतीय लष्कर अकॅडमीची पासिंग परेड पार पडल्यानंतर हितेशला लेफ्टनंट पदावर नियुक्त करण्यात आलं. इतकंच नाही तर हितेश त्याच बटालियनमध्ये सहभागी होणार आहे ज्यामध्ये त्याचे वडिल होते. पासिंग परेड झाल्यानंतर हितेशने आपल्या शहीद वडिलांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘गेली १० वर्ष मी भारतीय लष्करात भरती होण्यातं स्वप्न पाहत होते. हे माझ्या आईचंही स्वप्न झालं होतं. आता मला प्रामाणिकपणा आणि अभिमानाने देशाची सेवा करायची आहे’, अशी भावना हितेशने व्यक्त केली आहे. यापेक्षा जास्त मी काही मागू शकत नाही असं सांगताना हितेशची आई कमेश बाला यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

‘बचन एक शूर जवान होते. जेव्हा आमच्या बटालियनवर तोलोलिंग येथे हल्ला झाला तेव्हा त्यांच्या डोक्याला गोळी लागली आणि युद्दभूमीवरच ते शहीद झाले. त्यादिवशी आमचे एकूण १७ जवान शहीद झाले. त्यामध्ये देहरादूनचे मेजर विवेक गुप्ता यांचाही समावेश होता. बचन यांचा मुलगा लष्करात भरती झाल्याचं पाहून प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे’, असं बचन यांचे बटालियनमधील सहकारी ऋषीपाल सिंह बोलले आहेत.

Story img Loader