कारगिल युद्धावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच भारताच्या नावाने बोटे मोडणाऱ्या पाकिस्तानला आता घरचा अहेर मिळाला आहे. या युद्धात मुजाहिदीन नव्हे तर पाकिस्तानी सैनिकांनीच भाग घेतला होता असा गौप्यस्फोट आयएसआयचे माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल शाहीद अझीझ यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारासाठी तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हेच दोषी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कारगिल युद्धाला भारताने नव्हे तर पाकिस्तानने सुरुवात केली व त्यात मुजाहिदीनांचा नाही तर लष्कराचाच सहभाग होता असे अझीझ यांनी म्हटले आहे. ‘द नेशन’ या इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी कारगिल युद्धातील अनेक गुपिते उघड केली आहेत. तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी संपूर्ण देशाला अंधारात ठेवून कारगिल युद्धाची व्यूहरचना केली. काश्मीर खोऱ्यात सैनिक घुसवायचे व भारतीय ठाणी काबीज करून सियाचेनमधील भारतीय रसदपुरवठा खंडित करायचा, याला भारताकडून फारसा विरोध होणार नाही व मुजाहिदीनांनी घुसखोरी केल्याचा कांगावा पाकने करायचा अशी योजना मुशर्रफ यांनी आखली असा दावा अझीझ यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे हे सर्व आडाखे धुळीस मिळाले व भारताने या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अपुऱ्या शस्त्रांनिशी लढणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना नाहक प्राण गमवावे लागले असे अझीझ यांनी लेखात म्हटले आहे.
आयएसआयच्या पृथक्करण विभागाचे आपण प्रमुख होतो, त्यामुळे लष्कराच्या कनिष्ठ स्तरावर काय चुका झाल्या याच्या चौकशीची जबाबदारी आपल्यावर होती. त्यामुळे सीमेवर जाऊ इच्छिता मुशर्रफ यांनी आपल्याला अडवले व आपल्याला अधिक चौकशी न करण्याच्या सूचना दिल्या असे अझीझ यांनी म्हटले आहे. मुशर्रफ यांच्या चुकांमुळे सैनिकांना नाहक प्राण गमवावे लागले व पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती असे अझीझ म्हणतात. लष्कराची तयारीही अपूर्ण होती, असे असतानाही कोणत्या बळावर आपल्या सैनिकांना थंडीत कुडकुडत व रिकाम्या शस्त्रांनिशी भारतीय हद्दीत घुसण्याचे आदेश देण्यात आले, हे युद्ध कोणासाठी लढले गेले, असे अनेक प्रश्न निरुत्तरित राहतात असेही अझीझ म्हणतात.
कारगिल ही पाकचीच युद्धखोरी होती
कारगिल युद्धावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच भारताच्या नावाने बोटे मोडणाऱ्या पाकिस्तानला आता घरचा अहेर मिळाला आहे. या युद्धात मुजाहिदीन नव्हे तर पाकिस्तानी सैनिकांनीच भाग घेतला होता असा गौप्यस्फोट आयएसआयचे माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल शाहीद अझीझ यांनी केला आहे.
First published on: 28-01-2013 at 02:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kargil was war by pakistan