कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या ‘चित्रदूर्ग’ मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरुघा शरानारू यांच्याविरोधात कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांनंतर शिवामूर्ती यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळं, सागरी बंदरांना पोलिसांकडून याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
“सिसोदियांना अटक केली तर गुजरातमध्ये…”; अरविंद केजरीवालांचं मोठं वक्तव्य
कर्नाटकातील या मठाधीशाविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी मैसुर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर शिवामूर्ती यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठाद्वारे संचालित एका शाळेमध्ये शिकणाऱ्या १५ आणि १६ वर्षीय मुलींनी गेल्या साडेतीन वर्षांपासून मठाधीशांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे.
या पीडित अल्पवयीन मुलींनी मठातून पळ काढल्यानंतर कोट्टनपेट पोलीस ठाणे गाठले. या ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने अखेर या मठाधीशाविरोधात मैसुरच्या नाझारबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन मुलींनी केलेले हे आरोप शिवामूर्ती यांनी फेटाळले आहेत. हे आपल्या विरोधात रचलेलं कटकारस्थान असून या प्रकरणात लवकरच निर्दोषत्व सिद्ध करू, असे शिवामूर्ती यांनी म्हटले आहे.