Kolkata Rape Case Sanjay Roy Pollygraph Test : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याची रविवारी पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांनी ही चाचणी घेतली असून या चाचणीत संजय रॉय याने सर्व चुकीची उत्तरे दिल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
या चाचणीदरम्यान संजय रॉय अस्वस्थ आणि चिंताग्रस्त दिसत होता. त्याने खोटी आणि न पटणारी उत्तरे दिली आहेत, असं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटलंय. दरम्यान, रॉयच्या वकील कविता सरकार यांनी दावा केला की बचाव पक्षाच्या वकिलांनी ही चाचणी केव्हा आणि कुठे केली जाईल, याची माहिती दिली नव्हती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बचाव पक्षाचा कोणताही वकील उपस्थित राहू शकला नाही, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> Kolkata Doctor Murder : विकृतीचा कळस; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पैसे कमावण्याचा प्रयत्न; पीडितेच्या नावाने…
“ती आधीच मृतावस्थेत होती”
सूत्रांनी सांगितलं की रॉयने दावा केला की तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला.
संजय रॉयला ८ आणि ९ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांविषयी वारंवार प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिली आहेत, असं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवलं नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का आहेत? असेही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. दरम्यान, पुढील काही दिवसांत चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका नागरी स्वयंसेवकाचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात येणार आहे. रविवारी आणखी दोन डॉक्टरांची चाचणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, कोलकाता येथील उच्च न्यायालयाने सीबीआय़ला मुख्य संशयित संजय रॉय आणि माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासहसात जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी दिली. रॉयने यापूर्वी गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चाचणीलाही संमती दिली. पण चाचणीदरम्यान त्याने चुकीची उत्तरे दिली. दरम्यान,काही दिवसांपूर्वी सेमिनार हॉलमधील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती आले होते. त्यानुसार, गळ्यात ब्लुथूट इअरफोन घालून संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करत असताना दिसत आहे. त्यामुळे त्याची आता आणखी कसून चौकशी करण्यात येणार आहे.