Karnataka Assembly : कर्नाटकमध्ये सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सहकार मंत्री के.एन.राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना केलेल्या एका दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका केंद्रीय नेत्यासह ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा मंत्री के.एन.राजन्ना यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर आज कर्नाटकच्या विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं.

यातच आज कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. त्यामुळे हनी ट्रॅपचा मुद्दा आणि सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारं विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत मोठा गदारोळ केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर काही कागदपत्रे भिरकावली. त्यामुळे सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी आता भाजपाच्या १८ आमदारांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या १८ आमदारांचं ६ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी केली होती. तसेच या कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी विरोधी भाजपाच्या आमदारांनी सभागृहात कागदपत्रे फाडून गोंधळ घातला होता. त्यामुळे या कारणावरून कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी भाजपाच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.

दरम्यान, या १८ आमदारांनी विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच निलंबित आमदारांपैकी काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन कागदपत्रे भिरकावल्याचा आरोप आता सत्ताधारी आमदारांनी केला. यानंतर अखेर आज भाजपाच्या १८ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबित आमदारांमध्ये कोणाचा समावेश?

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये विरोधी पक्षाचे मुख्य सचेतक दोड्डानागौडा एच पाटील, अश्वथ नारायण सीएन, एसआर विश्वनाथ, बीए बसवराज, एमआर पाटील, चन्नाबासप्पा (चन्नी), बी सुरेश गौडा, उमानाथ ए कोट्यान, शरणु सालगर, शैलेंद्र बेलदाले, सीके रामामूर्ती, यशपाल ए सुवर्णा, बीपी हरीश, भरत शेट्टी वाय, मुनीरत्ना, बसवराज मट्टीमूद, धीरज मुनीराजू आणि चंद्रू लमाणी यांचा समावेश आहे.

Story img Loader