Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. यात अनेक जुन्या नेत्यांना डच्चू देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पक्षामध्ये उमेदवारीवरून नाराजी असली तरी, विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमताने निवडून येऊ, तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातदेखील मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे नेते, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरूमधील मालेश्वरम मतदारसंघातून अश्वथ नारायण यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाशी त्यांनी बातचीत केली.
प्र. : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करावा लागू शकतो?
अश्वथ नारायण : राज्यात भाजपासाठी चांगले वातावरण दिसत आहे. राज्यात कुठलीही अँटी-इन्कम्बन्सी नाही. याउलट आम्हाला भाजपाच्या बाजूने, प्रो-इन्कम्बन्सी दिसत आहे. २००८ आणि २०१८ च्या निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमताच्या जवळ गेलो होतो. या निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमत मिळवू, असा विश्वास आम्हाला वाटतो.
प्र. :बंगळुरूमध्ये मागच्या तीन निवडणुकांत तुमच्या जागा कमी कमी होत गेल्या?
अश्वथ नारायण : बंगळुरूमध्ये इतर पक्षांपेक्षा आम्ही अधिक जागा जिंकू. २०१८ साली जरी आम्ही फक्त ११ जागा जिंकलो होतो तरी त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत (२०१९) आम्ही आणखी काही जागा मिळवल्या. या वेळी बंगळुरूमध्ये आम्ही १८-२० तरी जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे.
प्र. : भाजपाने उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यासाठी उशीर लावला, याचे काही कारण?
अश्वथ नारायण : मागच्या काही काळातील भाजपाची रणनीती पाहिल्यास निवडणूक जाहीर होताच, आम्ही तयारीला लागतो. त्यामुळे उशीर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील अद्याप सुरू झालेली नाही. जेव्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा आम्ही उमेदवार यादी जाहीर करत असतो. मला वाटते यात नवीन काही नाही. ही भाजपाची परंपरा राहिली आहे. अनेक वर्षांपासून कितीतरी निवडणुका आम्ही अशाच पद्धतीने लढत आहोत.
प्र. : जनता दल आणि काँग्रेसने खूप आधी उमेदवार जाहीर केले, याचा भाजपाला फटका बसेल?
अश्वथ नारायण : भाजपा हा एका परिवाराचा किंवा काही मोजक्या लोकांकडून चालविला जाणार पक्ष नाही. हा लोकांचा पक्ष आहे. लोकांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व भाजपाकडून केले जात असल्यामुळे लोक पक्षाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला इतर पक्षांसारखी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची घाई नसते. आमच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्यांची कामगिरी पुरेशी आहे. लोक याच आधारावर आम्हाला मतदान करतात.
प्र. : कर्नाटकमधील इतर भागांपेक्षा जुन्या म्हैसूर प्रांताचे भाजपासमोर आव्हान आहे. या ठिकाणी वोक्कालिगांचा प्रभाव आहे. तुम्ही वोक्कालिगा समुदायातून येत असल्यामुळे याबाबत काही वेगळी रणनीती केली आहे का?
अश्वथ नारायण : कर्नाटकमधील सर्वच भागांत पक्षाला यश मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पक्षाला जुन्या म्हैसूर प्रांतात चांगले यश मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. भाजपा हा असा एकमात्र पक्ष आहे, जो कोणत्याही आव्हानांचा सक्षमपणे सामना करू शकतो. जसे की, म्हैसूर संस्थानाचे राजे नलवाडी कृष्णराजा यांनी केले. आम्ही जुन्या म्हैसूरमधील लोकांना गतकाळातील ते वैभवशाली प्रशासन पुन्हा देण्याचा प्रयत्न करू.
प्र. : या निवडणुकीत भाजपाकडून वोक्कालिगा किंवा लिंगायत चेहरा कोण?
अश्वथ नारायण : आमच्या पक्षात आम्ही जातीच्या महत्त्वानुसार काम करत नाहीत. भाजपा हा सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारा आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. चांगले प्रशासन कसे देता येईल याला आम्ही प्रथम प्राथमिकता देत आहोत.
प्र. : निवडणुकीच्या प्रचारासाठी डेटा ॲनालिस्ट कंपनीची मदत का घेण्यात येत आहे?
अश्वथ नारायण : निवडणुकीच्या काळात माहितीला खूप महत्त्व असते. निर्णय घेताना आणि रणनीती ठरवत असताना डेटाची मदत होते, तसेच आपल्या निर्णयावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हेदेखील जाणून घेता येते. लोकांच्या प्राथमिकता काय आहेत? नेत्यांकडून त्यांना काय अपेक्षित आहे? अशा प्रकारची जमिनी स्तरावरील माहिती आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी लाभदायी ठरते. यात काही नवीन नाही. सर्वच पक्ष अशी मदत घेत असतात. आता फरक एवढाच की, आता अचूक माहिती मिळण्याची साधने विकसित झाली आहेत. यापूर्वी अशी माहिती गोळा करण्यासाठी खूप वेळ लागत होता.