कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष कर्नाटकची जनता आपल्या बाजूनेच कौल देईल असा दावा करत आहेत. कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने देशात मोदीविरोधी लाट असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पण गुजरातपासून ईशान्येकडच्या राज्यांपर्यंत विजय मिळवल्यामुळे मोदी विरोधी लाट असल्याच्या विरोधकांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही असा भाजपाचा दावा आहे. कर्नाटकात पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरमय्या काँग्रेसचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याआधी देवराज युरस (१९७२ ते १९७७) आणि एसएम कृष्णा (१९९९-२००४) यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
१) १९७८ साली कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. त्यावेळी देशामध्ये सर्वत्र इंदिराविरोधी लाट होती. लोकांचा कल जनता पार्टीच्या बाजूने होता. जनता पार्टीला एकापोठ एक राज्यांमध्ये विजय मिळत होता. पण त्यावेळी कर्नाटकाच्या जनतेने काँग्रेसलाच सत्तेच्या खुर्चीत बसवले.
२) १९८३ साली देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष महत्वाची भूमिका बजावत होता. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. पण त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने जनता पार्टीला कौल दिला. राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
३) १९८४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी संपूर्ण देशात काँग्रेसने ४१४ जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले. कर्नाटकातही काँग्रेसला उत्तम यश मिळाले. त्यावेळचे जनता पार्टीचे तत्कालिन मुख्यमंत्री राम कृष्ण हेगडे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला. कर्नाटकात जनता पार्टीला २८ पैकी फक्त ४ जागा जिंकता आल्या होत्या.
४) १९८५ साली पुन्हा विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कर्नाटकच्या जनतेने जनता पार्टीच्या पारडयात भरभरुन मते टाकली. राज्यात पुन्हा जनता पार्टीचे सरकार आले. कर्नाटकच्या जनतेने लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्यावेळी पूर्णपणे वेगळे मतदान करुन आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली होती.
५) १९८९ साली बोफोर्स घोटाळयानंतर विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जनता दलची स्थापना केली. त्यांनी जनता कुटुंबातील वेगवेगळया घटकांना एकत्र आणले. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला पण कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.