नवी दिल्ली : कर्नाटकची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी भाजपनेत्यांची राहुल गांधींविरोधातील टीका अधिकाधिक तीव्र होऊ लागली आहे. भाजपने बुधवारी पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि विद्यमान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मैदानात उतरवले. ‘काँग्रेसकडे कोणतीही राजकीय विचारसरणी उरलेली नसून हा पक्ष देशद्रोही आहे’, असा तीक्ष्ण हल्लाबोल शिंदे यांनी केला.काँग्रेसने शिंदेंवर पलटवार केला असून काँग्रेसशी निष्ठावान न राहणारा नेता भाजपशीही प्रामाणिक राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदेंपासून सावध राहा, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेरा यांनी पंतप्रधान मोदींना दिला.
केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजत असल्याचा आरोप केला. न्यायालयाने शिक्षा ठोठावली असतानाही राहुल गांधी स्वत:साठी ‘विशेष दर्जा’ची मागणी करत आहेत. त्यासाठी ते न्यायालयावरही दबाव आणण्यात आहेत. गांधी कुटुंबासाठी वेगळा कायदा लागू करण्याची मागणी काँग्रेसचे नेते करत आहेत. खरेतर काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात स्थान उरले नसून हा पक्ष टिकून राहण्याची धडपड करत आहे, अशी टीकाही शिंदेंनी केली. काँग्रेसने ओबीसींचा अपमान केला. जवानांच्या शौर्यावर शंका घेतली. जवानांना चिनी सैनिकांनी झोडपून काढल्याची आवई उठवली. काँग्रेस आता वैचारिक दिवाळखोर झाली असून देशद्रोही बनला असल्याचा आरोप शिंदेंनी केला.
शिंदेंनी गद्दारी केली- पवन खेरा
‘काँग्रेसमध्ये शिंदेंना मानाने वागवले गेले. पण त्यांनी भाजपमध्ये जाऊन काँग्रेसशी गद्दारी केली’, अशी चपराक प्रवक्ता पवन खेरा यांनी दिली. ‘शिंदे राजकारणात टिकून राहण्याची भाषा करतात तेव्हा मला तेच डोळय़ासमोर दिसतात. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला, मित्र बदलले, निष्ठा गहाण टाकल्या. आता हेच शिंदे काँग्रेसला अक्कल शिकवत आहेत’, अशी उपहासात्मक टिप्पणी खेरा यांनी केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी २०२० मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.