कर्नाटक जिंकण्यासाठी आम्ही बूथ स्तरापासून बांधणी केली होती. संघटन शक्तिच्या बळावर आम्ही ही निवडणूक जिंकली. हे पूर्णपणे टीमवर्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला घरोघरी पक्षाची प्रसिद्धी पत्रके पोहोचण्याऐवजी प्रत्यक्ष घरापर्यंत जाऊन मतदारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही तोच सल्ला अंमलता आणला अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे भाजपा प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटक विजयाचे रहस्य उलगडले.

कर्नाटकात भाजपाची रणनिती ठरवण्यामध्ये प्रकाश जावडेकर यांची महत्वाची भूमिका होती. ते मागच्या ८० दिवसांपासून कर्नाटकामध्ये तळ ठोकून होते. आम्ही निवडणूक प्रचारा दरम्यान कुठेही गटातटाचे राजकारण केले नाही तसेच कुठलीही निवडणूक आम्ही गांर्भीयाने घेऊन जिंकण्यासाठी मेहनत करतो असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कर्नाटकात जोरदार प्रचार करताना दिवसरात्र अथक मेहनत घेतली. ते आमच्या पक्षाची संपत्ती आहेत अशा शब्दात जावडेकरांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

कर्नाटकातील जनतेला सुशासन हवे आहे. त्यामुळेच कर्नाटकातील जनतेने भाजपाची निवड केली आहे. भाजपासाठी हा मोठा विजय आहे. काँग्रेस राज्यापाठोपाठ राज्य गमावत असताना आम्ही राज्यापाठोपाठ राज्य जिंकत चाललो आहोत असे प्रकाश जावडेकर यांनी या विजयाचे वर्णन केले.

 

Story img Loader